नितीन नायगांवकर
नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण झाले. पण आता निवडणूक संपली आहे आणि त्यासोबत राजकीय शत्रुत्वही संपले आहे. यापुढे सर्व पक्षांसोबत काम करून दिल्लीला जगातील सर्वोत्तम शहर बनवायचे आहे, असे प्रतिपादन अरविंद केजरीवाल यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केले. रामलीला मैदानावर शपथविधीनंतर त्यांनी दिल्लीकरांशी संवाद साधला. दिल्लीच्या विकासासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आशीर्वाद द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘इन्कलाब जिंदाबाद’ अश्या घोषणांनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली. ‘मेरे प्यारे दिल्लीवासीयों’ असा उल्लेख करताच रामलीला मैदानावर टाळ््यांचा कडकडाट झाला. केजरीवाल म्हणाले की, आज तुमच्या मुलाने तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गेली पाच वर्षे दिल्लीतील प्रत्येक परिवारात आनंद पेरण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही तेच करणार आहे. आता तुम्ही आपापल्या गावी फोन करून सांगा...‘हमारा बेटा सीएम बन गया है’.या निवडणुकीत कुणी आम्हाला, कुणी भाजपला, तर कुणी काँग्रेसला मत दिले. पण आजपासून मी काँग्रेस आणि भाजपवाल्यांचाही मुख्यमंत्री आहे. गेली पाच वर्षे कुणासोबतही सावत्र व्यवहार केला नाही आणि पुढेही करणार नाही. एखादी वस्ती भाजपला मत देणार आहे, हे माहिती असतानाही त्यांचे काम केले. कारण तेदेखील माझ्या कुटुंबाचाच भाग आहेत, याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.‘जगभरात डंका वाजवू’या निवडणुकीमुळे संपूर्ण देशात दिल्लीचा डंका वाजू लागला आहे. कुणी मोहल्ला क्लिनिकच्या धरतीवर योजना आणत आहेत, तर कुणी वीज मोफत देत आहेत. येत्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण जगात दिल्लीचा डंका वाजेल, असे काम करण्याचा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.‘आम्ही माफ केले’‘निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी खूप राजकारण झाले. आमच्याबद्दल बरेच काही बोलले गेले. पण, आता आम्ही त्यांना माफ केले आहे. आमच्यापासून कुणी दुखावले असेल तर त्यांनीही झाले गेले विसरून जावे,’ असे आवाहन केजरीवाल यांनी केले.५० विशेष निमंत्रितसोहळ््यात मुख्य आकर्षण होते मुख्य व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला उपस्थित असलेले ५० विशेष निमंत्रित. सफाई कामगार, रिक्षाचालक, शिक्षक, डॉक्टर, पोलीस, खेळाडू, विद्यार्थी, शहीद जावानांचे कुटुंबिय आदी सर्वच क्षेत्रातील या मान्यवरांचा अनोखा सन्मान यावेळी झाला.