लखनौ - पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने (PMGKY) अंतर्गत गरीबांना नोव्हेंबरनंतर मोफत रेशन मिळणे कठीण आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की, सध्या नोव्हेंबरनंतरही या योजनेअंतर्गत गरिबांना रेशन देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र, मोदी सरकारची ही योजना आता बंद होत असली तरी योगी सरकार ही योजना आणखी 4 महिने सुरूच ठेवणार आहे. अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली. पंतप्रधान गरिब कल्याण योजनेंतर्गत देशातील जनतेला नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य देण्यात आले आहे. केंद्र सरकारने ही योजना आता बंद केली आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी मार्च महिन्यापर्यंत ही योजना सुरूच ठेवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशमध्ये घेतला आहे. त्यामुळे, पुढील 4 महिने येथील सर्वसामान्य जनतेला मोफत रेशनचं धान्य मिळणार आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये डाळ, तेल आणि मीठ हेही वाढीव मिळणार आहे.
पीएल. पुनिया यांनी लगावला टोला
योगी सरकारच्या या निर्णयानंतर छत्तीसगडमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार पी एल. पुनिया यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटलंय. तसेच, उत्तर प्रदेशात अद्यापही 15 कोटी जनता गरीबच आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, युपीमध्ये 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे, योगी सरकारने दोन दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर, आता मोफत रेशनचं धान्य देण्याचाही निर्णय घेतला आहे.