Arvind Kejriwal Arrested: दिल्लीतील मद्य घोटाळ्यातील कथित मनी लाँड्रिग प्रकणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा धक्का बसला आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच, त्यांना 6 दिवसांच्या ED कोठडीत पाठवले आहे. केजरीवाल यांना आता 28 मार्च रोजी न्यायालयात हजर केले जाईल.
या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार केजरीवाल आहेत, त्यामुळे त्यांना 10 दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीने केली होती. मात्र न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची कोठडी सुनावली. आता त्यांना 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर कले जाईल.
दरम्यान, राऊस एव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीच्या वतीने सहाय्यक सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत. केजरीवाल यांनी इतर नेत्यांसोबत मिळून हा कट रचला. दिल्लीत नवीन मद्य धोरण लागू करण्यात केजरीवाल यांचा थेट सहभाग होता. या संपूर्ण प्रकरणात पीएमएलए अंतर्गत अनेक आरोप आहेत.
केजरीवालांचे वकील काय म्हणाले?
तर, वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केजरीवालांची बाजू मांडली. त्यांनी म्हटले की, निवडणुकीत सहभाग घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ईडी रिमांड पेपरवर इतकी घाई का करत आहे? ईडीकडे अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कुठलाही थेट पुरावा नाही. तपासात सहभागी 50 टक्के लोकांनी केजरीवालांचे नाव घेतले नाही. तर 80 टक्के लोकांनी केजरीवालांसोबत कुठलीही डीलिंग झाल्याचा उल्लेख केला नाही. काहीही न सांगता अटक करू शकत नाही. अरविंद केजरीवाल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
ईडीचा केजरीवालांवर आरोपईडीने आपल्या रिमांड नोटमध्ये आप पक्षाचे वर्णन कंपनी असे केले आहे. ईडीच्या रिमांड नोटमध्ये केजरीवाल हे मास्टरमाईंड असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अबकारी धोरण बनवण्यात केजरीवाल यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे ईडीचे म्हणने आहे. तसेच, लाच म्हणून मिळालेला पैसा गोवा निवडणुकीत गुंतवण्यात आला. विजय नायर आणि मनीष सिसोदिया यांच्या सहकार्याने साऊथ लॉबीकडून पैसे घेण्यात आल्याचा दावाही ईडीने केला आहे.
'आप' पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय म्हणाले की, 26 मार्च रोजी आम आदमी पार्टी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहे. उद्या दिल्लीतील शाहिदी पार्क येथे आपचे दिल्लीतील सर्व आमदार, नगरसेवक आणि इंडिया आघाडीचे विविध नेते हुकूमशाहीविरोधात एकत्र येतील. देश वाचवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.