नवी दिल्ली: पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर लगेचच पूर्व किनारपट्टीला यास या चक्रीवादळाने (Yass Cyclone) तडाखा दिला. ओडिसा, पश्चिम बंगालसह अन्य राज्यांतही यास चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागांचा हवाई दौरा केला. त्यानंतर आता पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांसाठी एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सदर माहिती देण्यात आली आहे. (pmo declares one thousand crore rupees aid to yaas cyclone damage)
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, यास चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झालेल्या पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड राज्यांना १ हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच या चक्रीवादळात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना दोन लाख तसेच गंभीररित्या जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले.
राज्यांचा दौरा करून पुढील मदत करणार
पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहणार असून, यानंतर जो अहवाल केंद्राला सादर करण्यात येईल. त्यानुसार पुढील मदत केली जाईल. या संकटाच्या काळात ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांना केंद्राचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तत्काळ उपाययोजना करण्यासाठी १ हजार कोटींची मदत दिली जात असून, ओडिशाला ५०० कोटी रुपये तातडीने दिले जाणार असून, उर्वरित ५०० कोटी रुपये पश्चिम बंगाल आणि झारखंडला चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या आधारावर दिले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.
ममता बॅनर्जींचा नाराजीचा सूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीला भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना निमंत्रित केल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त करत हजेरी न लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली आणि राज्यातील परिस्थितीचा आढावा सादर केल्याचे सांगितले जात आहे.