मुंबई - पर्वतीय परिसरात पर्यटकांकडून किंवा भाविकांकडून केला जाणा-या कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यास पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला सांगितलं आहे. या आदेशावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. भारतीय लष्कराने कचरा उचलण्याचं काम करावं यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लष्कराचं काम हे देशाला सुरक्षित ठेवणं असतं देशातील कचरा साफ करणं नाही अशी टीका अनेकांनी केली आहे.
हा आदेश येताच सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल एचएस पनाग यांनी “काव-काव करणं बंद करा आणि कामावर चला ! आदेश पीएमओने दिला आहे आणि सर्व देश तुमच्या पाठिशी आहे'' असं खोचक ट्विट केलं. पनाग यांच्या ट्वीटवर अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले . त्यावर उत्तर देताना त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये “आदेश आदेश असतो, पालन करावच लागतं, असं म्हटलं.
त्यावर, ज्या परिसरामध्ये लष्कराला साफ-सफाई करण्यास सांगितलं आहे तेथे साफसफाई कर्मचारी पोहोचू शकत नाही असं ट्विट करत एका युजरने पीएमओच्या आदेशाचा बचाव केला. पण 'ज्या ठिकाणी पर्यटक किंवा भाविक जाऊन कचरा करू शकतात तर ते स्वतःचा कचरा स्वतः साफ देखील करू शकतात. सैनिक स्वतः केलेला कचरा स्वतःच साफ करत असतात' असं उत्तर पनाग यांनी दिलं.
जम्मू-काश्मीरच्या कारगिल, लदाख, पूर्वोत्तर भारतातील सिक्कीम आणि उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात. पीएमओच्या या आदेशाची माहिती संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांनी मीडियाला दिली. अनेक पर्वतीय परिसरांमध्ये सामान्य लोकांना पोहोचणं कठीण असतं, तरीही काही भाविक तेथे पोहोचण्यात यशस्वी होतात. त्या परिसरांतील परिस्थितीमुळे तेथे असलेला कचरा कधी साफ करता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता ठेवणं हा देखील स्वच्छता अभियानाचा एक उद्देश आहे.