ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २६ - गेल्या आठवड्यात भीमराव आंबेडकर विद्यापीठातील दीक्षांत सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काही विद्यार्थ्यांनी केलेल्या घोषणाबाजीबद्दल विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांनी माफी मागितली आहे. याप्रकरणी एक माफीनामा तयार करण्यात आला असून शेकडो विद्यार्थ्यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. सोमवारी संध्याकाळी हा माफीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात आंबेडकर विद्यापीठामध्ये झालेल्या दीक्षांत समारंभासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित होते. मात्र त्याचवेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांचे भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर एका विद्यार्थ्याला हॉलच्या बाहेर काढण्यात आले तर काही जणांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. मात्र या घटनेमुळे समारंभाला गालबोट लागलेच.
काही विद्यार्थ्यांचे वर्तन विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांना खटकल्याने त्यांनी याप्रकरणी पंतप्रधान मोदींची माफी मागण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये अभियान चालवून ८ मीटर लांब कापडावर अनेक विद्यार्थ्यांच्या सह्या घेण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या पाठिंबा मिळवण्यासाठी मोर्चाही काढण्यात आला.
या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.