ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - हेरखात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतरही अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला दहशतवादी हल्ला रोखण्यात अपयश आल्याने विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडले आहे. आज उपराष्ट्रपतीपदासाठी आपल्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी 18 विरोधी पक्षांची बैठक संसदेच्या लायब्ररीत झाली. यावेळी गुप्त सुचना असतानाही अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला भ्याड हल्ला रोखता न आल्याने सरकारने आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा टोला विरोधी पक्षांनी लगावला.
अमरनाथ यात्रेकरूंवर अनंतनाग येथे झालेला हल्ला हा माणुसकी आणि देशाच्या विविधतेवरील हल्ला असल्याचे विरोधी पक्षांनी सांगितले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा हल्ला म्हणजे सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर आणि अस्वीकाहार्य त्रुटी असल्याचे मत व्यक्त केले. तसेच या हल्ल्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारावी असा टोलाही त्यांनी लगावला. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. "सुरक्षेतील ही त्रुटी गंभीर आणि अस्वीकाहार्य आहे. याची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली पाहिजे. तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ देता कामा नये."
गुप्त सूचना असतानाही हा हल्ला रोखता आला नाही, यासाठी सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे विरोधी पक्ष म्हणले. तसेच त्यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला. दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचा समावेश होता. अधिक वाचा
( अमरनाथ यात्रा हल्ला; बसचालक सलीमला 3 लाखांचं बक्षीस जाहीर )(अमरनाथ हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश)
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.