सुरेश भटेवरा , नवी दिल्लीमाजी पंतप्रधान मनमोहनसिंगांवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत थेट व्यक्तिगत हल्ला चढवल्याने संतप्त काँग्रेस सदस्यांनी बराच गोंधळ घातला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी मनमोहनसिंग यांच्यासह सर्वच अर्थतज्ज्ञांच्या ज्ञानालाही आव्हान दिले.मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर गेली ३५ वर्षे देशाच्या बहुतांश आर्थिक निर्णयाशी डॉ. मनमोहनसिंग संबंधित होते. त्यांच्याइतकी अनुभवी व्यक्ती क्वचितच असेल. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मात्र बरेच आर्थिक घोटाळे झाले. तरीही डॉ. मनमोहनसिंगांवर कलंकाचा एकही डाग लागला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ कशी करावी, हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. या विधानामुळे गदारोळ झाला. पंतप्रधानांनी मनमोहनसिंग यांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली. कपिल सिब्बल म्हणाले, मोदींवर मनमोहनसिंगांनी कधीही हेत्वारोप केले नाहीत. सरकारच्या धोरणविषयक त्रुटींवरच केवळ प्रकाशझोत टाकला. त्याचे मुद्देसूद उत्तर देण्याऐवजी पंतप्रधान मोदी व्यक्तिगत पातळीवर घसरले. या मुद्द्यावर बराच गदारोळ झाल्यानंतर काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. त्या वेळी चढ्या स्वरात मोदी म्हणाले, सरकारवर संघटित लूट केल्याचा आरोप करणाऱ्यांनी त्याचे उत्तर ऐकण्याचे धाडसही दाखवले पाहिजे.
पंतप्रधानांचा मनमोहनसिंग यांच्यावर व्यक्तिगत हल्ला
By admin | Published: February 09, 2017 2:10 AM