नवी दिल्ली : सरकार अहंकारी आणि हेकेखोर असल्याचा आरोप करीत काँगे्रसने रविवारी संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर टाकली.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधक अडून बसल्यामुळे गत आठवडाभरापासून संसदेत कुठलेही कामकाज होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ता रणदीप सूरजेवाला बोलत होते. आयपीएल घोटाळ्यातील आरोपीची मदत करताना सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट आहे. असे असताना त्यांनी दिलेले स्पष्टीकरण बिनबुडाचे आहे. संसद सुरळीत चालावी यासाठी भाजपने हितापलीकडे विचार करून या भाजप नेत्यांविरुद्ध कारवाई करणे ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे, असे सूरजेवाला म्हणाले. काँगे्रस नेते आनंद शर्मा यांनीही संसदेच्या कोंडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जबाबदार धरले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
संसद सुरळीत चालविण्याची जबाबदारी पंतप्रधानांची
By admin | Published: July 26, 2015 11:47 PM