मुंबई: देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबई शाखेत जवळपास 11 हजार 360 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईतील एका शाखेतून ठराविक खातेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी बेकायदा व्यवहार होत होता. घोटाळ्याची ही रक्कम बॅंकेच्या एकूण बाजार मुल्याच्या(मार्केट कॅपिटलायझेशन) जवळपास एक तृतियांश आहे. त्यामुळे शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सला 10 टक्क्यांचं नुकसान झालं आहे तर सामान्य खातेधारकाला त्याच्या बॅंकेत जमा असलेल्या प्रत्येक 100 रूपयांमागे 30 रूपयांचं नुकसान सहन करावं लागू शकतं असा दाट अंदाजही वर्तवला जात आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनुसार पंजाब नॅशनल बॅंकेचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 36 हजार 566 कोटी रूपये आहे आणि त्यांनी जवळपास 4.5 लाख कोटी रूपये मार्केटमध्ये कर्ज दिलं आहे. बॅंकेतील घोटाळ्याच्या वृत्तानंतर गुंतवणुकदारांना एक दिवसात जवळपास 3 हजार कोटी रूपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे. बँकेने या घोटाळ्याविषयी मुंबई शेअर बाजाराला माहिती दिली आहे.या घोटाळ्यात सामील असलेल्या व्यक्तींची नावे बँकेने अद्याप जाहीर केलेली नाहीत. मात्र, त्यांची माहिती तपास यंत्रणांना दिली आहे, असे बँकेने सांगितले.सामान्यतः कोणत्याही बॅंकेत दोन पद्धतीने पैशांचा व्यवहार होतो. पहिला पर्याय म्हणजे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि दुसरा पर्याय म्हणजे बॅंकेचे ग्राहक जे आपले पैसे व्याजासाठी बॅंकेत जमा करतात. कॉर्पोरेट देखील शेअर्सच्या माध्यमातून बॅंकेत जमा पैसा करत असतात. या घोटाळ्यामध्ये खोट्या ट्रान्झेक्शनद्वारे घोळ केल्याचं बॅंकेनं सांगितलं आहे, म्हणजे पैसे शेअर होल्डरकडून जमा करण्यात आले नव्हते हे स्पष्ट होतं. तसंच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानेही हे पैसे दिले नव्हतेच. अशावेळेस खोट्या ट्रान्झेक्शनमुळे कोणाचं नुकसान होतं तर बॅंकेच्या लाखो सामान्य खातेधारकांचं. जर बॅंक खोट्या ट्रान्झेक्शनमुळे घोटाळा झाल्याचं म्हणत असेल तर बॅंकेकडे या ट्रान्झेक्शनची कोणती माहिती उपलब्ध नाहीये. त्यामुळे खोट्या ट्रान्झेक्शनद्वारे पैसे कुठे ट्रान्सफर झाले हे माहित करून घेण्यासही बॅंक सक्षम नाही. म्हणजे हे पैसे परत मिळवण्याच्या परिस्थितित बॅंक असण्याची शक्यताही कमीच आहे. शेवटचा पर्याय म्हणजे जर बॅंकेला एकूण मार्केट कॅपिटलायझेशनच्या एक तृतिशांश नुकसान झालंय तर याची नुकसान भरपाई बॅंकेच्या खातेधारकांच्या पैशांमधून केली जाईल. अशा परिस्थितीत जर बॅंकेत एखाद्या ग्राहकाचे 100 रूपये जमा असतील तर त्याला 30 रूपयांवर पाणी सोडावं लागेल.
PNB महाघोटाळा : बॅंकेत तुमच्या जमा प्रत्येक 100 रूपयांपैकी 30 रूपये गायब?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 6:12 PM