पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टाने हे वॉरंट जारी केले आहे. पंजाब नॅशनल बँकेची तब्बल 13 हजार कोटींची फसवणूक करुन नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी परदेशात पळून गेले आहेत. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने पीएनबीच्या मुंबईतील फोर्ट परिसरातील ब्रॅडी हाऊस शाखेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन मोठा घोटाळा केला. बोगस लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या मदतीने त्यांनी बँकेला तब्बल 13 हजार कोटींना चुना लावला. या प्रकरणाचा तपास ईडी आणि सीबीआयकडून सुरु आहे. सीबीआयने चौकशीसाठी नीरव आणि चोक्सीला नोटीस पाठवली होती. मात्र त्यांनी चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. ईडीने नीरव मोदीविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयकडून एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पीएनबी घोटाळा जानेवारी महिन्यात उघडकीस आला. पीएनबीने या घोटाळ्याची तक्रार दिल्यावर तपास यंत्रणांनी मोदी आणि चोक्सीविरोधात कारवाई सुरु केली. ईडीने आतापर्यंत दोघांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. तर सीबीआयने पीएनबीच्या अनेक अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
PNB Fraud: नीरव मोदी, मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2018 5:03 PM