नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेतील महाघोटाळ्याचे सूत्रधार नीरव मोदी आणि मेहुल चोकसी या दोघांचा पासपोर्ट शनिवारी रद्द करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून भारतीय तपासयंत्रणाकडून नीरव मोदी आणि चोकसी यांच्या मालमत्तांवर छापे टाकून त्यांच्याभोवतीचा फास आवळला जात आहे. यापूर्वी तपासयंत्रणांकडून या दोघांचेही पासपोर्ट निलंबित करण्यात आले होते. जेणेकरून नीरव मोदी आहे त्याचठिकाणी अडकून पडले, असा तपास यंत्रणांचा कयास होता. मात्र, आता दोघांचेही पासपोर्ट थेट रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, या कारवाईनंतर नीरव मोदी याच्या वकिलांनी सक्तवसुली संचलनालय आणि पासपोर्ट यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्याची टीका केली आहे. एकीकडे ईडी नीरव मोदी यांना चर्चेसाठी बोलावते. मात्र, त्यांचा पासपोर्टच रद्द झाला तर ते भारतात कसे येऊ शकतील ? आपण परदेशात असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, असे नीरव मोदीचे वकील विजय अग्रवाल यांनी म्हटले. यापूर्वीही त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या दुटप्पी भूमिकेवरही टीका केली. नीरव मोदी यांनी केलेल्या व्यवहारांपोटी बँकेने कोट्यवधी रुपयांचे कमिशन घेतले आहे. बँकेला मोदी करत असलेल्या व्यवहारांची पूर्णपणे माहिती होती. परंतु, आता बँक ही गोष्ट मानायला तयार नाही. मुळात हा संपूर्ण व्यावसायिक बँकिंग व्यवहार असताना त्याला घोटाळ्याचे स्वरूप देण्यात आले. गेल्या कित्येक वर्षांपासून बँकेला त्यांचा हिस्सा व्यवस्थितपणे मिळत होता, असेही अग्रवाल यांनी सांगितले होते. तसेच नीरव मोदी हे देशाबाहेर पळून गेलेले नाहीत. त्यांचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. ते व्यावसायिक कारणांसाठी परदेशात असतानाच हे संपूर्ण प्रकरण समोर आले. मात्र, पासपोर्ट निलंबित करण्यात आल्याने त्यांची अडचण झाल्याचे विजय अग्रवाल यांनी सांगितले.