नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच आरोपी मेहुल चोकसीचा व्हिडीओ समोर आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून करण्यात आलेले आरोप चुकीचे व निराधार असल्याचे मेहुल चोकसी याने म्हटले आहे.
'एएनआय' या वृत्तसंस्थेने मेहुल चोकशीचे व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले आहेत. यामध्ये मेहुल चोकसी याने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून करण्यात आलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. मला जाणीवपूर्वक घोटाळ्यात अडकवले गेले आहे. माझी मालमत्ता चुकीच्या पद्धतीने सील करण्यात आली आहे, असा आरोप मेहुल चोकसीने केला आहे.
दरम्यान, पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार झालेला मुख्य आरोपी नीरव मोदी याचा मेहुल चोकसी हा मामा आहे. सध्या मेहुल चोकसी हा अँटिग्वा या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अँटिग्वा व बर्ब्युडा सरकारकडे औपचारिक विनंती केली आहे. भारत आणि अँटिग्वाच्या सरकारमध्ये प्रत्यार्पण करार झाला असून, त्यामुळे मेहुल चोकसीला पुन्हा भारतात आणणे शक्य होणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी आपल्याला अटक होऊ शकते याची कुणकुण लागताच मेहुल चोकशी देशाबाहेर पळून गेला होता. तसेच विविध देशांमध्ये लपूनशपून वास्तव्य करत अखेर त्याने अँटिग्वा या देशाचे नागरिकत्व मिळवले होते. त्याच्या अँटिग्वातील वास्तव्याची माहिती मिळाल्यानंतर भारत सरकारने त्याचा प्रत्यार्पणासाठी अँटिग्वामधील प्रशासनाबरोबर चर्चा सुरू केली होती.