नोटाबंदीनंतर झाली पीएनबी घोटाळ्याला सुरूवात , राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 09:02 AM2018-02-18T09:02:52+5:302018-02-18T09:05:59+5:30
पीएनबी महाघोटाळ्याची सुरूवात, जेव्हा पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या आणि देशातील सगळा पैसा बॅंकेमध्ये टाकला तेव्हाच झाली
नवी दिल्ली : कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर हल्लाबोल करताना पीएनबी घोटाळ्याची सुरूवात पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर झाल्याचा आरोप केला. या घोटाळ्याची सुरूवात, जेव्हा पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या आणि देशातील सगळा पैसा बॅंकांमध्ये टाकला तेव्हाच झाली, असा दावा राहूल गांधींनी केला. मोदींनी लोकांच्या खिशातून पैसे काढून घेऊन ते बँकांमध्ये घातले. आता त्यांचे मित्र व सहकारी ते पैसे बँकांमधून लुटून नेत आहेत, असं राहुल म्हणाले.
पीएनबीचा ११,४०० कोटींचा घोटाळा व त्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीचे देशातून पलायन यावरून थेट तोफ डागताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची वित्तीय व्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप शनिवारी केला.मोदी यांनी त्यांच्या कृतींनी देशाची वित्तीय व्यवस्था बरबाद केली आहे. त्यांनी लोकांच्या खिशातून पैसे काढून घेऊन ते बँकांमध्ये घातले, आता त्यांचे मित्र व सहकारी ते पैसे बँकांमधून लुटून नेत आहेत, असं राहुल म्हणाले. या घोटाळयाचे खापर काँग्रेस व संपुआ सरकारच्या माथी मारून भाजपा मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करीत आहे, असे सांगताना राहुल गांधींनी आरोप केला की, अत्यंत वरच्या पातळीवरून संरक्षण असल्याखेरीज एवढा मोठा घोटाळा होऊच शकला नसता. सरकारमधील मंडळींना पूर्वकल्पना असल्याखेरीज हे घडू शकत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी मुख्य विषयाला बगल न देता आम्ही विचारलेल्या प्रश्नांना रोखठोक उत्तरे द्यावीत.
सुकाणू समितीची बैठक-
राहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करून नियुक्त केलेल्या सुकाणू समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत ५ मार्चपूर्वी पक्षाचे अधिवेशन घेण्याबाबत चर्चा झाली. राहुल गांधी यांची पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाली असली तरी त्यावर शिक्कामोर्तब काँग्रेसच्या अधिवेशनात होईल. सुकाणू समितीच्या आजच्या बैठकीस यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, गुलाब नबी आझाद, ए. के. अँथनी, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आदी नेते उपस्थित होते.
पक्षाची नवीन कार्यकारिणी अधिवेशनात निवडली जाईल. राहुल गांधी यांनी सध्याची कार्यकारिणी रद्द करताना ३५ सदस्यांची सुकाणू समिती नेमली. कार्यकारिणीचे सर्व सदस्य सुकाणू समितीचेही सदस्य असले तरी त्यातून अमरिंदर सिंग, विलास मुत्तेमवार, आर. के. धवन, शिवाजीराव देशमुख, मोहसिना किडवाई, एम.व्ही. राजशेखरन या कायम निमंत्रितांना तसेच सर्व विशेष निमंत्रितांना वगळले आहे.
सुकाणू समितीचे इतर सदस्य
बी. के. हरिप्रसाद, डॉ. सी. पी. जोशी, दिग्विजय सिंग, हेमो पूर्वो सैकिया, जनार्दन द्विवेदी, कमल नाथ, मोहन प्रकाश, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, सुशीला तिरिया, अशोक गेहलोत, के. सी. वेणुगोपाळ, अविनाश पांडे, सुशीलकुमार शिंदे, दीपक बाबरिया, पी. सी. चाको, आशा कुमारी, डॉ. ए. चेल्ला कुमार, आर.पी.एन. सिंग, पी. एल. पुनिया, आर. सी. खुंटाई, डॉ. कर्ण सिंग, पी. चिदम्बरम, आॅस्कर फर्नांडिस, आनंद शर्मा व रणदीप सूरजेवाला.