मुंबई- पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने जनरल मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या राजेश जिंदाल याला अटक केली आहे. राजेश जिंदाल हा ऑगस्ट २००९ ते मे २०११ या कालावधीत मुंबईतील फोर्ट येथील ब्रॅडी हाऊस शाखेत शाखा व्यवस्थापक होता. याच शाखेतून पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा खुलासा झाला.
पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 11 हजार 400 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई करत सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरा जिंदालला अटक केली. दरम्यान, या प्रकरणी पीएनबीचे तीन अधिकारी अटकेत आहेत. यात फायरस्टार डायमंड्स इंटरनॅशनल समूहाचा अध्यक्ष विपुल अंबानी, नीरव मोदीच्या कंपनीतील कार्यकारी सहाय्यक कविता माणकीकर, फायरस्टाचा वरिष्ठ अधिकारी अर्जुन पाटील, नक्षत्र समूहाचा मुख्य वित्त अधिकारी कपिल खंडेलवाल आणि गीतांजली समूहाचा व्यवस्थापक नितीन शाही यांचा समावेश होता.
दरम्यान, या प्रकरणात सोमवारी सीबीआयने पंजाब नॅशनल बँकेच्या फोर्ट येथील ब्रॅडी हाऊस शाखेला टाळं ठोकलं होतं. या प्रकरणात अटक झालेले बँकेचे निवृत्त उपमहाव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी आणि कनिष्ठ अधिकारी मनोज खरात यांच्या चौकशीनंतर बँकेच्या ब्रॅडी हाऊसमधील शाखेवर सीबीआयचं लक्ष होतं. सोमवारी दिवसभर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शाखेची कसून तपासणी केली. तपास यंत्रणेने सोमवारी बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली.