मुंबई - पंजाब नॅशनल बँकेतील 11,400 कोटी रुपयांच्या घोटाळया प्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या घोटाळयाच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला मेहुल चोकसीच्या कंपनीचे संचालक चाळीत, छोटयाशा खोलीत राहत असल्याचे समोर आले आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार हिऱ्यांच्या व्यवसायात अब्जोपती असलेल्या मेहुल चोकसीच्या कंपनीचे संचालक मात्र छोटयाशा फारशा सुखसोयी नसलेल्या घरात राहत आहेत.
या संचालकांनी आपला पत्ता रजिस्टर केला होता. त्या पत्त्याचा शोध घेतल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. कागदोपत्री दाखवलेले हे संचालक प्रत्यक्षात सर्वसामान्य कर्मचारी, छोटे गुंतवणूकदार आहेत. गिली इंडिया, नक्षत्र ब्रँड लिमिटेड आणि गितांजली जेम्स या कंपन्यांनी त्यांना आमिष दाखवून कागदोपत्री संचालक बनवले होते. नीरव मोदी आणि मेहुल चोकसीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रेटींच्या अंगावर त्यांच्या ब्रँडसचे महागडे हिऱ्यांचे दागिने असायचे.
पण तेच त्यांच्या कंपन्यांच्या संचालकांची घर चालवण्यासाठी मारामार असायची. पीएनबी बँकतीला हा महाघोटाळा समोर आल्यानंतर मेहुल चोकसीच्या कंपनीतील या नाममात्र संचालकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच आयुष्यच बदलून गेलं आहे. सीबीआय आणि ईडीकडून या घोटाळयाशी संबंधित छापेमारी सुरु असून संशयितांना अटक केली जात आहे. त्यामुळे हे संचालक आणि त्यांचे कुटुंबिय तणावाखाली आहेत. सरकारी नियमानुसार सर्व कंपन्यांना त्यांच्या संचालकांचे निवासी पत्ते आणि अन्य माहिती देणे बंधनकारक आहे.
काय म्हणतो नीरव मोदी सर्व देणी चुकती करण्याची मी ‘ऑफर’ दिली असताना, तुम्ही महाघोटाळ्याची विनाकारण आवई उठवून झटपट वसुलीची कारवाई सुरू केलीत. परिणामी, धंदा बंद झाल्याने माझ्याकडून वसुली करण्याच्या तुमच्या क्षमतेवर मर्यादा आल्या आहेत. तुम्हीच तुमच्या कृतीने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला, असे पत्र पीएनबीतील ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख नीरव मोदी याने बँकेला लिहिले आहे.
दि. १५/१६ फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या पत्रात मोदी लिहितो की, बँकेत तुम्ही घोटाळ्याची वाच्यता करण्याच्या आदल्या दिवशी (१३ फेब्रुवारी) व १५ फेब्रुवारी रोजी मी तुम्हाला ‘आॅफर’ दिली होती, परंतु थकीत रक्कम झटपट वसूल करण्याच्या अतिउत्साहात तुम्ही माझ्या ब्रँडची व धंद्याची वाट लावलीत. परिणामी, पैसे वसूल करण्याची तुमचीच क्षमता कमी होऊन थकीत रकमा वसूल न होता तशाच राहिल्या.