नवी दिल्ली -पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीच्या तब्बल 41 मालमत्तांवर ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे. चोकसीच्या जप्त केलेल्या या मालमत्तांची किंमत तब्बल 1217 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये मुंबईतील 15 घरं आणि 17 कार्यालयांचा समावेश आहे. तर कोलकातामधील शॉपिंग मॉल आणि अलिबागमधील चार एकर जमिनीवरील फार्महाऊसदेखील जप्त करण्यात आले आहे.
याशिवाय, जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये अलिबाग, नाशिक, नागपूर, पनवेल व विल्लुपुरममधील 231 एकर जमिनीवर पसरलेली संपत्ती आणि आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यातील 170 एकर जमिनीवरील एक हार्डवेअर पार्कचाही समावेश आहे. या पार्कची किंमत 500 कोटी रुपये एवढी आहे.
दरम्यान, बुधवारी सीबीआयनं पंजाब नॅशनल बँकेतील 13 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी बँकेचे मुख्य परीक्षक (चीफ ऑडिटर) एम.के. शर्मा यांना अटक केली. बँकेच्या लेखा परीक्षणाचे ते प्रमुख होते. इतका महाघोटाळा लेखा परीक्षकांच्या लक्षात यायलाच हवा होता. तो त्यांच्या लक्षात आला नाही की, त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, हे सीबीआय तपासून पाहत आहे. तसंच या घोटाळ्यात त्यांची भूमिका तर नव्हती ना? याचीही चौकशी केली जाणार आहे.