नवी दिल्ली- अंमलबजावणी संचलनालयानं पीएनबी घोटाळ्याच्या प्रकरणात आरोपी नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई केली आहे. ईडीनं नीरव मोदीविरोधात एक गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचलनालयानं नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांना 23 फेब्रुवारीला मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. तर आजच नीरव मोदीच्या 11 राज्यांतील 35 ठिकाणी अंमलबजावणी संचलनालयानं छापे टाकले आहेत.छापेमारीत ईडीनं 549 कोटी रुपयांचे हिरे आणि सोनं जप्त केलं आहे. अशा प्रकारे गुरुवारी आणि शुक्रवारी मारण्यात आलेल्या छाप्यात एकूण 5 हजार 649 कोटी रुपयांच्या 29 स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तसेच नीरव मोदीच्या कंपन्यांनी न्यू यॉर्क, लंडन, मकाऊ आणि बीजिंग इथल्या कार्यालयांमार्फत कोणतीही खरेदी-विक्री करू नये, असे आदेश मुख्य कार्यालयाला ईडीनं दिले आहेत. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांचे पारपत्र चार आठवड्यांसाठी स्थगित केले आहेत.परराष्ट्र मंत्रालयानं दोघांकडून एक आठवड्यांच्या यात या प्रकरणावर स्पष्टीकरण मागवलं आहे. तसेच तुमचं पारपत्र का रद्द केलं जाऊ नये, असा प्रश्नही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं विचारला आहे. दुसरीकडे सीबीआयनं आज पीएनबीचे माजी अधिकारी गोकुलनाथ शेट्टी यांच्या घराचीही झाडाझडती घेतली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून शुक्रवारी इंटरपोल डिफ्युजन नोटीस जारी करण्यात आली. नीरव मोदीसोबत त्याची पत्नी अमी मोदी, भाऊ निशाल मोदी आणि गीतांजलीचे प्रमोटर मेहुल चौकसी यांना पकडण्यासाठी इंटरपोललाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नीरव मोदीभोवतीचा फास आणखी आवळला गेला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, नीरव मोदी, पत्नी अमी मोदी, भाऊ निशाल मोदी आणि गीतांजलीचे प्रमोटर मेहुल चौकसी हे चौघेही जानेवारीच्या सुरुवातीलाच भारतातून पसार झाले होते. सध्या नीरव मोदी स्वित्झर्लंडमध्ये लपून बसल्याची चर्चा आहे. याआधी अंमलबजावणी संचलनालयाने मोदी आणि चौकसीला समन्स बजावले होते. तत्पूर्वी सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारपासून नीरव मोदीच्या देशभरातील मालमत्तांवर छापे टाकायला सुरूवात केली. यात 5100 कोटी रुपयांची हिरे, ज्वेलरी, मौल्यवान खडे आणि सोन्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या एका अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मोदी आणि अन्य आरोपींच्या मुंबईतील पाच संपत्ती सील करण्यात आल्या आहेत.या शिवाय बँक खात्यातील रक्कम आणि फिक्स डिपॉझिटची 3.9 कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली. पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून ही कारवाई केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मुंबई, हैदराबाद, जयपूर, गुजरात आणि दिल्लीमध्ये किमान 17 जागांवर करण्यात आली. ईडीने ज्या जागांवर ही कारवाई केली त्यात मोदीचे मुंबई येथील कुर्ला भागातील घर, काळा घोडा भागातील ज्वेलरीचे दुकान, वांद्रा आणि लोअर परळ भागातील कंपनीची तीन ठिकाणे, गुजरातमधील सुरत येथील तीन ठिकाणे आणि दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी व चाणक्यपुरी भागातील मोदीचे शोरूम यांचा समावेश आहे.
PNB SCAM: नीरव आणि चौकसीला ईडीनं बजावलं समन्स, 35 ठिकाणी मारले छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 9:36 PM