मुंबई - पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 12,636 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. चंदा कोचर यांच्यासहित अॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा यांनाही नोटीस पाठवण्यात आलं आहे. गितांजली ग्रुपला कर्ज वितरित केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदा कोचर सध्या सीबीआय कार्यालयात उपस्थित आहेत. 6 मार्चला त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं होतं. दरम्यान सीबीआयने मंगळवारी घोटाळ्याशी संबंधित तपासासाठी गितांजली ग्रुपचे बँकिंग व्यवहार सांभाळणारे उपाध्यक्ष विपुल चितालिया यांचीही चौकशी केली. विपुल चितालिया बँकाँकवरुन परतले असता सीबीआयने मुंबई विमानतळावरुनच त्यांना चौकशीसाठी नेलं.
हिरा व्यापारी नीरव मोदीसोबत मेहुल चोकसीवर 12,636 कोटींच्या पीएनबी घोटाळ्याचा आरोप आहे. याच घोटाळ्यात अतिरिक्त 1300 कोटींचा घोटाळा झाल्याचा खुलासा 26 फेब्रुवारीला झाला होता. सीबीआयने 14 फेब्रुवारीला नीरव मोदी, त्याची पत्नी एमी, भाऊ निशाल मोदी, मेहुल चोकसी आणि त्यांच्या कंपन्या डायमंड आर यूएस, सोलर एक्सपोर्ट्स आणि स्टेलार डायमंडविरोधात पहिला एफआयआर दाखल केला होता. निरव मोदी, त्याचं कुटुंब आणि मेहुल चोकसी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देश सोडून फरार झाला होता. सीबीआयने गितांजली ग्रुपविरोधात 4,886.72 कोटींची फसवणूक केल्याचा दुसरा गुन्हा 15 फेब्रुवारीला दाखल केला होता.
विराट कोहलीचा पंजाब नॅशनल बँकेसोबतच्या कराराचे नुतनीकरण न करण्याचा निर्णय नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) तब्बल 12,600 कोटींचा घोटाळा केल्यानंतर बँकेची प्रतिमा चांगलीच मलीन झाली आहे. या घोटाळ्यानंतर गुंतवणूकदारांच्या ठेवींना कोणताही धोका नाही, असे बँकेकडून आश्वस्त करण्यात आले होते. परंतु, या सगळ्यामुळे बँकेची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने पंजाब नॅशनल बँकेसोबतच्या कराराचे नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट हा बँकेचा सदिच्छादूत आहे. मात्र, नुकत्याच उघड झालेल्या घोटाळ्यामुळे विराटने ही भागीदारी संपविण्याचा निर्णय घेतला आहे.
विराटच्या क्रिकेट एजन्सीकडून याबद्दलची माहिती देण्यात आली. विराटने यापुढे बँकेसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला असला तरी सध्याच्या कराराची मुदत संपेपर्यंत विराट त्यांच्यासोबत असेल. मात्र, सध्याच्या कराराचे नुतनीकरण केले जाणार नाही. या संपूर्ण घटनाक्रमात बँक म्हणून पीएनबीचा कोणताही दोष नाही, असे आम्हाला वाटते. विराट ठरलेल्या कराराची मुदत पूर्ण करणार आहे. त्यामुळे आम्ही स्वत:हून करार रद्द केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कॉर्नरस्टोन स्पोर्टस अँण्ड एंटरन्टेन्मेंटचे सीईओ बंटी सजदेह यांनी सांगितले.
यापूर्वी पंजाब नॅशनल बँकेने विराटने सदिच्छादूत (ब्रँड अॅम्बेसिडर) म्हणून असलेला त्यांच्यासोबतचा करार रद्द केल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. थकीत कर्जांमुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्रात चितेंचे वातावरण असताना स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी 'पीएनबी'ने विराटला करारबद्ध केले होते.