नवी दिल्ली- हजारो कोटींचा पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करून देशाबाहेर परागंदा झालेल्या नीरव मोदीविरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आल्यानंतर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसीविरोधात विविध तपास यंत्रणा चौकशी करत आहेत.तत्पूर्वी नीरव मोदीविरोधात विशेष न्यायालयानं अंमलबजावणी संचलनालयानं प्रत्यार्पणाची कारवाई सुरू करण्यास परवानगी दिली होती. ईडीनं सोमवारी प्रत्यार्पणासंबंधी अर्जही दिला होता. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसीविरोधात अनेक सरकारी यंत्रणा तपास करत आहेत. दोन्ही परदेशात पळाल्यानंतर सीबीआय आणि ईडीनं त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केलं होतं. नीरव मोदीविरोधात हवाला प्रकरणात सुनावणी करत असलेल्या विशेष न्यायालयानं ईडीला कारवाईची परवानगी दिली आहे.ईडीचे वकील हितेन वेंगावकर या प्रकरणातील आदेशाला परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवणार आहे. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय तोच आदेश ब्रिटिश सरकारला पाठवेल. सूत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणांनी इतर देशांनाही नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासंबंधी अर्ज पाठवले आहेत. नीरव मोदी वारंवार वास्तव्याची ठिकाणं बदलत असतो. नीरव मोदीविरोधात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये आधारे न्यायालयानं त्याला अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे.
PNB Scam: नीरव मोदीविरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 10:55 AM