नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींना चुना लावून परदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या बहिणीविरोधात इंटरपोलने 'रेड कॉर्नर नोटीस' काढली आहे. पूर्वी दीपक मोदी असे तिचे नाव असून तिच्यावर पैशांच्या अफरातफरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. सक्तवसुली संचालनालयाने मागणी केल्याने पूर्वी विरोधात ही नोटीस बजावण्यात आली आहे.
इडी पीएनबी घोटाळ्याप्रकरणी पुर्वीची चौकशी करणार आहे. मार्चमध्ये तिला सहआरोपी बनविण्यात आले होते. तिच्यावर मुंबईतील पीएनबीच्या ब्रेडी हाउस शाखेमध्ये पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. पूर्वी ही इंग्रजी, गुजराती आणि हिंदी बोलू शकते. तसेच ती बेल्जियमची नागरिक आहे.
इंटरपोल या रेड कॉर्नर नोटीसद्वारे त्याच्या 192 सदस्य असलेल्या देशांना अशा व्यक्तींविरोधात अटक किंवा ताब्यात घेण्याचे आदेश देते. यामुळे या आरोपीचे प्रत्यार्पण केले जाऊ शकते. नीरव मोदीसह त्याचा अमेरिकेतील व्यवहार सांभाळणारा अधिकारी मिहिर भन्साळीविरोधातही इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढली होती.