नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेतील ११,३00 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी भारतात परत यावे आणि तपास यंत्रणांना सामोरे जावे, यासाठी केंद्र सरकारने त्यांच्याविरुद्ध फास आवळायला सुरुवात केली आहे. दोघांचे पासपोर्ट शुक्रवारी निलंबित करण्यात आले. 11,300 कोटींच्या घोटाळ्यात नीरव मोदी व मेहुल चोकसी या दोघांना बँकेतील काही अधिकाऱ्यांनी साथ दिल्याचा आरोप आहे. यादरम्यान नीरव मोदी न्यूयॉर्कमधील एका बड्या हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर येते आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदी आमच्या कुठल्याही अधिकाऱ्याच्या संपर्कात नाही तसंच तो सध्या कुठे आहे, याबद्दलही माहिती नाही. पण एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार न्यूयॉर्कमधील जेडब्ल्यू मॅरियच्या अॅसेस हाऊसमधील 36 व्या मजल्यावरील एका स्वीटमध्ये नीरव मोदी आरामात राहतो आहे.
पासपोर्ट जप्त केल्यानंतर नीरव मोदी इतर कुठल्याही ठिकाणी जाऊ शकत नाही. तो ज्या देशात तेथेच त्याला रहावं लागेल. पासपोर्ट सस्पेंड करून सरकारला नीरव मोदीला अमेरिकेत ठेवायचं आहे. पण जर नीरव मोदीकडे इतर कुठल्या देशाचा पासपोर्ट किंवा पेपर्स असतील तर सरकारचीही योजना कामी येणार नाही, अशी शक्यात वर्तविली जाते आहे.
दरम्यान, मोदी व चोकसीच्या शोधासाठी सीबीआयने इंटरपोलशी संपर्क साधला आहे. त्यांच्याविरोधात ‘डिफ्यूजन नोटीस’ जारी करण्याची विनंती इंटरपोलला केली आहे. नीरव मोदी १ जानेवारी रोजी तर बेल्जियमचा नागरिक असलेला त्याचा भाऊ निशाल हाही त्याच दिवशी देशातून पळाला. अमेरिकी नागरिक असलेली नीरवची पत्नी ६ जानेवारी रोजी, तर मेहुल चोकसी ४ जानेवारीला भारतातून पळाले.सक्तवसुली संचालनालयाने पीएनबी घोटाळ्याची मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये चौकशी सुरू केली आहे. मोदी व चोकसी यांना एका आठवड्यात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. दोघांच्या कंपन्यांमधील संचालकांकडे नोटिसा हस्तांतरित केल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने दिवसभर ३५ नवीन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत, आणखी २९ मालमत्ता शोधून काढल्या आहेत. एकूण ११ राज्यांमध्ये कारवाईचा धडाका सुरु आहे. शुक्रवारी दिवसभर केलेल्या कारवाईत ५४९ कोटींचे सोने आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.