नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झालेत. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत हा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीरव मोदीनं केलेल्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. सोबत ''एवढा मोठा घोटाळा का आणि कसा झाला, याचं उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावं. तसंच या प्रकरणात ते नेमके काय करत आहेत?'', याचं स्पष्टीकरण देण्याची मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदमबरम यांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत राहुल गांधी पुढे असंही म्हणाले की, एवढा मोठा घोटाळा उच्च स्तरावरील संरक्षणाविना होणे शक्यच नाही. शनिवारी (17 फेब्रुवारी) पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी हे पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा कशा द्यावेत, याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. मात्र हा घोटाळा कसा झाला हे सांगत नाहीयत, असा टोलादेखील राहुल गांधी यांनी हाणला आहे.
या घोटाळ्याची सुरुवात 8 नोव्हेंबर 2016 पासून झाली होती. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि एक हजार रुपयांची नोट चलनातून रद्द केली आणि देशातील सर्व पैसा बँकिंग प्रणालीत ओतला, असा दावादेखील राहुल गांधी यांनी केला आहे. अशा पद्धतीनंच बँकांतून 22 हजार कोटी रुपये काढले जातात, असं म्हणत जनतेचा पैसा लुटून झालेल्या या घोटाळ्यासाठी जबाबदार कोण आहे?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
भाजपाला 2016 मध्येच नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती होती; शरद पवारांचा गौप्यस्फोट
तर दुसरीकडे, नीरव मोदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गौप्यस्फोट केला आहे. देशात सर्वात मोठी लूट करणाऱ्या नीरव मोदीच्या घोटाळ्याची लेखी तक्रार देशातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने प्रधानमंत्री कार्यालयात केली होती. मात्र, जाणूनबुजून या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नीरव मोदीला वाचवले, असा आरोप माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
नीरव मोदी प्रकरणी मनमोहन सरकारवर आरोप केले जात असले तरी नीरव याने २०११ मध्ये फक्त बँक खाते उघडले होते आणि बाकीची फसवणूक मोदी सरकारच्या काळातीलच असल्याचा आरोप पवार यांनी केला. पंतप्रधान कार्यालयाला याबाबत २०१६ मध्ये कळवूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने नीरव मोदी देशाला फसवून पळून जाण्यात यशस्वी ठरला, असेही पवार म्हणाले. देशाला फसवून पळून गेलेली ही मंडळी भाजपला पाठिंबा देणारी आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला.