मुंबई :
देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूची विक्री किंमत केंद्र सरकारने ११० टक्क्यांनी वाढविली आहे. त्यानुसार महानगर गॅसने किमतीमध्ये पुन्हा सुधारणा केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून मुंबई व परिसरात सीएनजीची किंमत प्रतिकिलो पाच रुपयांनी वाढली आहे, तर पीएनजीची किंमत चार रुपये ५० पैशांनी वाढली आहे. त्यानुसार, आता सीएनजी दर ७२ रुपये प्रतिकिलो, तर पीएनजी ४५ रुपये ५० पैसे प्रतिकिलो असे असणार आहे.
सीएनजी आणि घरगुती गॅसच्या उपलब्धतेतील कमतरता भरून काढण्यासाठी री-गॅसिफाइड एलएनजीची किंमत मिश्रित केली आहे. डी-पीएनजी विभागही उच्च पातळीवर असल्याने महानगर गॅसकडून किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
व्हॅट केला होता कमी- दरम्यान, १ एप्रिल रोजी राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील सीएनजी, पीएनजीसारख्या नैसर्गिक गॅसवरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी केला. - राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले. - महानगरच्या म्हणण्यानुसार, मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त झाला, तर पीएनजी हा पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस प्रती एससीएम (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर) ३ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. - नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रती किलो, तर पीएनजी ३६ रुपये प्रती एससीएम असेल.