विष प्राशनाचा बनाव केला अन् अंगाशी तोच आला
By admin | Published: November 19, 2015 9:55 PM
उमाळ्यातील घटना : शवविच्छेदन अहवालामुळे फुटले पित्याच्या खुनाचे बिंग
उमाळ्यातील घटना : शवविच्छेदन अहवालामुळे फुटले पित्याच्या खुनाचे बिंग जळगाव: वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा मुलाने बनाव केला, मात्र शवविच्छेदन अहवालात त्याचे बिंग फुटल्याने मुलावर खुनाचा गुन्हा दाखल होऊन कोठडीत जाण्याची वेळ आली. उमाळा ता.जळगाव येथे हा प्रकार घडला आहे. मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव रामचंद्र सीताराम बिर्हाडे (वय ५०) तर आरोपी मुलाचे नाव भावडू उर्फ राहुल रामचंद्र बिर्हाडे (वय २४) असे आहे.झटापटीत खांबावर आपटले डोकेपोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामचंद्र बिर्हाडे यांना दारुचे व्यसन होते. काहीही कामधंदा न करता सतत दारु पिऊन पत्नी कौशल्याबाई व मुलांना शिवीगाळ, मारहाण केली जात होती. त्याच्या या त्रासाला कुटूंबही कंटाळले होते. बुधवारी दुपारी दीड वाजता रामचंद्र हा दारू पिऊन आल्यानंतर मुलगा राहुल याच्याकडे पैशाची मागणी करीत होता.त्याला त्याने नकार दिल्याने दोघांमध्ये वादावादी झाली. या झटापटीत राहुल याने वडिलांचा गळा दाबला. त्यात नखांचे व्रण लागले. त्याच्यानंतर घरातील लाकडी खांब्याला डोके आपटल्याने रामचंद्र हे बेशुध्द पडले. कानातून रक्त येऊ लागले. ही परिस्थिती पाहून राहुल घाबरला. घरात कोणीच नसल्याने त्याने वडिलांना आतमध्ये कोंडून आतूनच दरवाजाची कडी लावून तेथून गायब झाला. नंतर संध्याकाळी चार तासांनी घरी गेल्यावर वडिलांनी विष प्राशन केल्याचा बनाव केला.अकस्मात मृत्यूनंतर खुनाचा गुन्हाशेजारी व ग्रामस्थ गोळा झाल्याने रामचंद्र यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संध्याकाळी शवविच्छेदन न झाल्याने ते गुरुवारी सकाळी करण्यात आले. या शवविच्छेदन अहवालात विष प्राशनाचा उल्लेखच आला नाही, उलट त्याच्या डोक्याला जबर मार लागून कानातून रक्त आले होते. मार लागल्यामुळे रामचंद्रचा मृत्यू झाल्याचा अहवाल आल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांनी सूत्र फिरवले. राहुल याने चौकशीत झाला प्रकार कथन केला. दुपारी उमाळा येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर राहुल याला अटक करण्यात आली. राहुल हा रिक्षा चालक तर त्याचा भाऊ ट्रॅक्टर चालक आहे.