श्रीनगर - पीओके म्हणजे पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे. जम्मू-काश्मीर ज्याप्रमाणे भारताचा भाग आहे तसेच पीओकेवर पाकिस्तानचा अधिकार आहे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काश्मीरचा मुद्दा सोडवायचा असल्यास आपल्याला पाकिस्तान बरोबर चर्चा करावी लागेल. केंद्र सरकारला काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर त्यांना पाकिस्तान बरोबर चर्चा करावीच लागेल असे फारुख अब्दुल्ला म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने दिनेश्वर शर्मा यांची निवड केली आहे. त्यांच्याबद्दल तुमचे मत काय ? या प्रश्न फारुख अब्दुल्ला म्हणाले कि, मी यावर जास्त बोलू शकत नाही. त्यांनी काही जणांबरोबर चर्चा केली आहे पण फक्त चर्चेने तोडगा निघणार नाही. काश्मीरचा मुद्दा हा भारत-पाकिस्तानमध्ये आहे. भारत सरकारने पाकिस्तानबरोबर चर्चा केली पाहिजे कारण काश्मीरचा काही भाग त्यांच्या ताब्यात आहे. फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेकदा अशा प्रकारची विधानं केली आहेत.
सर्व सैन्य लावले तरी दहशतवाद पुरून उरेल दोन वर्षांपूर्वी फारुख अब्दुल्ला म्हणाले होते कि, पाकिस्तानने व्यापलेले काश्मीर त्यांच्याकडेच राहणार आहे व भारताकडील काश्मीर आपल्याकडे राहणार आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि जम्मू-काश्मीर कधीच एक होऊ शकणार नाहीत, हे मी राजकारणात आल्यापासून सांगत आलो आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर परत मिळविण्याची ताकद आपल्यात नाही व आपले काश्मीर घेण्याचे बळ पाकिस्तानात नाही. आपल्याप्रमाणे तोही (पाकिस्तान) एक अण्वस्त्रधारी देश आहे. लष्कर तरी आपले किती संरक्षण करू शकेल. सर्व सैन्य जरी मदतीला आले तर ते दहशतवादी आणि बंडखोरांपासून आपला बचाव करू शकणार नाहीत. त्यामुळे (पाकिस्तानशी) चर्चा करून मार्ग काढणे हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो, यावर त्यांनी भर दिला.