- रमेश झवर
प्रचार यंत्रणा मजबूत राबवता आली की ख-याचे खोटे आणि खोट्याचे खरे करायला वेळ लागत नाही! अलीकडे वास्तव-अवास्तवाची सीमारेषासुध्दा प्रचारयंत्रणेने आणि आभासी जगाच्या तंत्राने पुसून टाकली आहे. पोकेमॉन गो हा जपानी कंपनीने शोधून काढलेला खेळ आणि रजनीकांतची प्रमुख भूमिका असलेला ‘कबाली’ सिनेमा ह्या दोघांमुळे सर्वत्र धमाल माजली आहे. ती पाहिल्यावर ‘अस्ति भाती प्रिय नामारूपात्मक विश्वाचा सिध्दान्त’ शंकराचार्यांना मागे घ्यावासा वाटला असता! किमान सिध्दान्ताची फेरमांडणी करताना त्यातील दृष्टान्त बदलावेसे त्यांना वाटले असते. विश्वामित्रानेदेखील प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न मुकाट्याने सोडून दिला असता! पोकेमॉन गो ह्या मोबाईलवरील खेळाने जगभरातील मुलांना आणि तरूणांना अक्षरशः झपाटून टाकले आहे. जो तो हातात मोबाईल घेऊन सॉफ्टवेअरच्या मदतीने पोकेमॉनचा शोध घेत फिरत असल्याचे दृश्य अनेक देशात दिसत आहे. पोकेमॉन शोधाचे हे फॅड पराकोटीला गेले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सरकारकडून वर्ज्य ठरवण्यात आलेल्या ठिकाणीसुध्दा पोकेमॉन शोधकर्ते प्रवेश करतील काय अशी भीती काही देशांतील संरक्षण यंत्रणांना वाटू लागली आहे.
जे पोकेमॉनच्या लोकप्रियतेबद्दल तेच तामिळ चित्रपटाचे महानायक रजनीकांतच्या ‘कबाली’ चित्रपटाबद्दल! शुक्रवार दिनांक 22 रोजी हा देशातल्या चार हजार चित्रपटगृहात हा चित्रपट तर प्रदर्शित झालाच; खेरीज सॅटेलाईटवरून प्रदर्शित करण्याचे हक्क निर्मात्याने 200 कोटी रुपयांना विकल्यामुळे फ्रान्ससह अनेक देशात तो प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटातसुध्दा पोकेमॉनप्रमाणे वास्तव आणि अवास्ववाचे बेमालूम मिश्रण आहे. पोकेमॉनमध्ये ज्याला शोधायचे ते पात्र पूर्णतः काल्पनिक असले तरी त्याला शोधण्याचा भाग मात्र खरोखरीचा आहे. कारण त्याला शोधायचे म्हणजे मोबाईल हातात घेऊन प्रत्यक्ष शोधण्याचा भाग गेममध्ये समाविष्ट असला नसला तरी खेळप्रेमींनी मात्र तो प्रत्यक्षात आणला आहे. ‘कबाली’ चित्रपटाचा नायक मलेशियातील कामगारांसाठी लढणारा दाखवण्यात आला असून तो ड्रग रॅकेटसह अन्य गुन्हेगारीतदेखील सामील झालेला दाखवला आहे. चित्रपटातगृहातले रजनीकांतभक्त मनाने समरस होतात. त्यांची समरसता इतकी वाढत गेली आहे की रजनीकांतला तामिळ प्रेक्षक जवळ जवळ देव समजू लागले आहेत.
‘कबाली’चा नायक रजनीकांत
हया दोन्ही करमणुकीत वास्तव आणि अवास्तवाची सरमिसळ अद्भूत आहे. बेमालूम आहे. त्यामुळे त्यात केव्हा सहभागी झालो हे त्यांच्या लक्षातही येत नाही. व्यावसायिक बाबतीत बोलायचे झाल्यास दोन्हींनी कमाईचे उच्चांक मोडले असे म्हणायला हरकत नाही. जगात सर्वत्र साहित्यक्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्रात अनेक अतिरथी-महारथी आहेत. ह्या सगळ्यांनी कितीही खटपट केली तरी पोकेमॉनला किंवा ‘कबाली’ला जसे यश मिळाले तसे यश त्यांना मिळेल की नाही ह्याबद्दल शंका वाटते.
पोकेमॉन खेळ जगातील 26 देशात अधिकृतरीत्या विकण्यात आला असला तरी भारतासारख्या देशात त्याची पायरेटेड व्हर्जन डाऊनलोड झालेली आहे. प्लेगच्या साथीप्रमाणे पोकेमॉनची जणू साथच अनेक देशात पसरत चालली आहे. सौदी अरेबियातल्या मुल्लामौलवींनी ह्या खेळाविरुध्द फतवा काढला. हा खेळ मुल्लामौलवींच्या मते, इस्लामविरोधी आहे. बोस्नियात पोकेमॉनचा शोध घेताना जमिनीत पेरलेल्या सुरुंगावर पाय पडणार नाही ह्याची काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. इजिप्त, इंडोनेशिया ह्या देशातही पोकेमॉनने वेगळ्याच समस्या उभ्या केल्या आहेत.
सेन्सारच्या मर्यादांना कुठेही आव्हान देण्याचा साधा प्रयत्नही कबालीने केला नाही. ना कलाबाह्य तंत्राचा वापर करून कलाकृती गाजवण्याची गरज त्यांना पडली! त्याचप्रमाणे प्रेक्षकांच्या अभिरूचीला नावे ठेवण्याचा उद्योगही ‘कबाली’च्या निर्मात्यांनी केला नाही. उलट, प्रेक्षकांना काय आवडेल, काय आवडणार नाही ह्याचाच विचार करण्याचे त्यांचे धोरण असावे. प्रत्येक वेळी गल्ला भरण्याचेच तंत्र त्यांनी अवलंबले आहे. अनैतिक मार्ग अवलंबण्यात आल्याचाही आरोप अजून तरी त्यांच्यावर करता येणार नाही. पुढेमागे आयकर अधिकारी त्यांच्यापुढे समस्या उभ्या करू शकतील. पण हे सगळे पुढचे पुढे पाहून घेता येईल असाच त्यांचा वागण्याचा एकूण रोख दिसतो.
‘कबाली’च्या कलात्मकतेबद्दल वा निर्मितीबद्दल समीक्षकांचे आक्षेप असू शकतात. नव्हे, आहेतच. परंतु पोकेमॉन खेळाच्या निर्मितीत व्यक्त झालेल्या कल्पकतेबद्दल आणि ‘कबाली’च्या नायकाच्या धडाडीबद्दल संशय घेण्यास वाव नाही. त्यांच्या सैराट एंटरप्राईजबद्दल त्यांचे कौतुक करावे की कपाळावर हात मारून घ्यावा हे ज्याचे त्याने ठरवावे! सर्वत्र होत असलेले त्यांचे हे कौतुक जगरहाटीत पराभूत ठरलेल्या लेखक-कलावंतांना मुळीच आवडणार नाही. परंतु हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ती ह्या निर्मात्यांची, कलावंतांची, सॉफ्टवेअर तयार करणा-या इंजिनीयर्सची आणि तंत्रज्ञांचीही काही एक विचारसरणी असून ती सर्वतंत्र स्वतंत्र आहे ! त्याला देशकालाच्या मर्यादा नाहीत. फार काय, मानवी जीवनात हरघडीला जाणवणा-या मर्यादादेखील नाहीत. अरेबियन नाईटस्, महाभारत, ग्रीक शोकान्तिका ह्यातले वातावरण तरी कुठे वास्तव आहे? सात सफरी करणारा सिंदबादसारखा सच्चा मुसलमान किंवा तैगरिस नदीत मासेमारी करणारा आणि आयुष्याच्या वाटचालीत थेट खलिफा होण्यापर्यंत मजल मारणारा कोळी, महाभारतातला कर्ण-अर्जुन किंवा भीष्म-द्रोण आणि ग्रीक नाटकातला जन्मदात्रीशी लग्न करणारा इडीपस राजा तरी वास्तवात कुठे भेटणार? व्यापक अर्थाने ही सगळी पात्रेसुध्दा आभासी विश्वातीलच आहेत!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)