- अनिल भापकर
मुंबई, दि. ६ - सध्या रिअॅलिटी गेमची क्रेझ भारतातही बरीच वाढली आहे.याचेच उदाहरण म्हणजे 'पोकेमॉन गो' या रिअॅलिटी गेमचे देता येईल. हा गेम सुरुवातीला फक्त काही देशातच ऑफिशिअली लाँच करण्यात आला तरी त्याची जगभरात एवढी क्रेझ वाढली की सुरुवातीच्या काही आठवड्यातच या गेम अॅपनं इंटरनेटवरील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. याचबरोबर रिअॅलिटी गेम किती योग्य आणि किती चुकीचं आहे, यावर देखील जोरदार चर्चा अशा थाटात सुरु झाली होती कि जणू काही पोकमॉन गो म्हणजे एक आंतरराष्ट्रीय समस्याच आहे.
मोबाईलवरील ‘पोकेमॉन गो’ गेमिंग अॅप निवडक देशांमध्ये लाँच करण्यात आले आहे. सुरुवातीला अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये लॉंच करण्यात आले होते. त्यांनतर जगभरातील २६ देशांमध्ये लॉंच करण्यात आले.भारतातही या गेम विषयी सुरुवातीला फार आकर्षण होते.
लोकप्रियता कमी होतेय ?
' पोकेमॉन गो ' ह्या गेम विषयी चे नेटप्रेमींचे आकर्षण भारतात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसत आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे एक तर हा गेम अद्याप भारतात अधिकृत लॉंच करण्यात आलेला नाही आणि या खेळाची निर्मिती करणा-या कंपनी कडून भविष्यात कधी ' पोकेमॉन गो ' भारतात लॉंच करण्यात येईल या विषयी काही ठोस सांगण्यात सुद्धा येत नाही. त्यामुळे नेटप्रेमींची एक प्रकारे निराशा होत आहे.
दुसरे म्हणजे ' पोकेमॉन गो 'हा गेम खेळण्यासाठी अर्थात ' पोकेमॉन ' शोधण्यासाठी सारखे फिरत राहावे लागते कारण हा गेम जीीपीएस तंत्रज्ञानावर आधारित असल्याने तुम्ही आहात ते ठिकाणा पासून काही अंतरावर तुम्हाला ' पोकेमॉन ' असल्याचे दाखविले जाते त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ' पोकेमॉन ' कलेक्ट करावा लागतो . त्यामुळे अपघाताच्या काही घटना सुद्धा घडल्या आहेत. तसेच ' पोकेमॉन गो ' कलेक्ट करण्याच्या नादात रस्ता वाहतुकीला अडथळा सुद्धा निर्माण होण्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.
तिसरे अजून एक कारण म्हणजे ' पोकेमॉन गो ' खेळ बनवणा-या कंपनीच्या विरोधात गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका ददाखल झाली आहे. या खेळामध्ये प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी अंडी दाखवण्यात आली आहेत त्यामुळे हिंदूच्या भावना दुखावत असल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे.पोकेमॉन गो खेळताना मिळणारे पॉईंट हे अंडयाच्या स्वरुपात मिळतात आणि हे पॉईंट गेममध्ये विविध प्रार्थनस्थळांच्या ठिकाणी मिळतात असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
अशा विविध कारणामुळे ' पोकेमॉन गो ' ह्या खेळाला भारतात अधिकृत लॉंच करण्या आधीच लोकप्रियता कमी होताना दिसत आहे.