ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - पोलंडमधील पोझान शहरात भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने हा विद्यार्थी हल्ल्यातून बचावला असून सुखरुप आहे. अमित अग्निहोत्री नावाच्या एका व्यक्तीने ट्विट करत पोलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाला असून यामध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा केला होता. यानंतर केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तात्कळा पोलंडमधील भारतीय राजदूत अजय बिसारिया यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवला.
सुषमा स्वराज यांनी अजय बिसारिया यांच्याशी सविस्तर बातचीत करत या घटनेची माहिती घेतली. अमित अग्निहोत्री यांनी मात्र नंतर हा तरुण हल्ल्यातून बचावला असून सध्या आयसीमध्ये त्याच्यावर उपचार चालू असल्याची माहिती दिली. अजय बिसारिया आणि सुषमा स्वराज यांनीदेखील या माहितीला दुजोरा दिला आहे. हल्ल्यात तरुणाला दुखापत झाली आहे. या विद्यार्थ्याचं नाव उघड करण्यात आलेलं नाही.
सुषमा स्वराज यांनी ट्विट करत, "पोलंडमध्ये मारहाणीची घटना घडली असून सुदैवाने तरुण बचावला आहे. आम्ही या घटनेची सविस्तर चौकशी करत असल्याचं", सांगितलं.
अमेरिकेप्रमाणे हा हल्लादेखील वर्णद्वेषातून झाला असल्याचं अग्निहोत्री यांनी सांगितलं आहे. "मारहाण करणारी व्यक्ती त्याच्याकडे पाहून ओरडली, आणि नंतर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला गंभीर जखमा झाल्या असून आयसीयूमध्ये भर्ती आहे", अशी माहिती अग्निहोत्री यांनी दिली आहे.
"माझ्या मित्राला जेव्हा मागून धक्का बसला तेव्हा त्याला मी मस्करी करत असल्याचं वाटलं. पण तो एका अनोळखी व्यक्तीने केलेला हल्ला होता. तरुणाच्या डोक्याला, हाताला आणि चेह-याला गंभीर दुखापत झाली असून रक्त वाहत होतं", असं अग्निहोत्री यांनी सांगितलं आहे.
स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय विद्यार्थ्यांवर भयंकर हल्ला करण्यात आला असून, मारहाण होत असताना खाली पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. जवळच्या लोकांनी पोलिसांना कळवून देखील वेळेत मदत मिळाली नाही.
गेल्याच महिन्यात अमेरिकेत भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचिभोतला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.