कर्नाटकात विधानससभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. यात काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवला. यावर आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत भारतीय जनता पक्षाने आढावा बैठक घेतली. यामध्ये तीन प्रमुख कारणे नमूद करण्यात आली आहेत. काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेला हमीभाव, मुस्लिमांची एकजूट आणि नेत्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे कर्नाटकातील पराभव झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
कर्नाटकच्या निवडणुकीची धुरा सांभाळणाऱ्या अनेक नेत्यांसोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या मुद्द्यावर बैठक घेतली आणि त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला. भाजपच्या एका नेत्याचे म्हणणे आहे की, कर्नाटकातील जवळपास प्रत्येक घरात 'काँग्रेस' हमीपत्र पोहोचवले. त्यातील बहुतांश आश्वासने महिलांसाठी होती. भाजपनेही जवळपास अशीच आश्वासने दिली होती, पण त्यात बराच विलंब झाल्याचेही ते म्हणतात.
भाजपच्या आढावा बैठकीत सर्वात मोठी बाब समोर आली ती म्हणजे पक्षातील नेत्यांमधील समन्वयाचा अभाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या व्यासपीठावर लिंगायत समाजातील तगडे नेते बीएस येडियुरप्पा यांना महत्त्व देत असतानाही राज्य पातळीवर अशा समन्वयाचा अभाव होता. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि बीएस येडियुरप्पा यांची जुळवाजुळव झाली नाही. भाजपने येडियुरप्पा यांना हटवून बोम्मई यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवले आहे.
कर्नाटकात एकूण ५६ मुस्लिम बहुल जागा आहेत. २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने यापैकी ४२ जागा जिंकल्या. येथे हिंदूंचे ध्रुवीकरण झाले. या निवडणुकीत परिस्थिती उलटी झाली. मुस्लिमांनी एकदिलाने मतदान केल्याचे भाजप गृहीत धरत आहे. या ५६ पैकी ५५ जागा काँग्रेसला मिळाल्या. भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. मुस्लिम मतांवर नजर टाकली तर काँग्रेसला ७८ टक्के, जेडीएसला १२ टक्के आणि भाजपला ५ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसने १५ मुस्लिम उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ९ आमदार होण्यात यशस्वी ठरले आहेत.