भोपाळ-
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ३ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या बस ड्रायव्हरच्या राहत्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. प्रशासनाकडून कडक कारवाई करत आरोपीचं घर पाडलं हे. राजस्व विभाग, पोलीस विभाग आणि नगरपालिकेनं संयुक्त कारवाई करत आरोपीचं घर पाडलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हरचं शाहपुरा क्षेत्रात वसंत कुंज कॉलनीजवळील टाकीच्या समोर गार्डनच्या जागेवर अवैध पद्धतीनं घर बांधलेलं होतं. ड्रायव्हरकडून तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनानं आरोपीचं घर शोधून काढलं आणि कारवाई करण्यात आली आहे. घरावर कारवाई करण्याआधी आरोपीच्या कुटुंबीयांना घर रिकामी करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर नियमानुसार अतिक्रमण विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
नामांकीत खासगी शाळेच्या बसमध्ये नर्सरीतील मुलीवर ड्रायव्हरकडून अत्याचार, कपडे बदलून पाठवलं घरी!
जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी एसडीएम आणि डीईओ यांना आदेश देत सर्व शालेय बसेसमध्ये महिला स्टाफ असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासोबतच बसमध्ये रेकॉर्डिंग कॅमेरा असणंही अनिवार्य करण्यात आलं आहे. यासाठी सर्व बसेसची तपासणी देखील करण्यात येईल. वेगवेगळ्या समित्यांची स्थापना व्हावी आणि सर्व बसेसची चाचणी करुन घेतली जावी असेही आदेश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांची जबाबदारी ही शालेय प्रशासनाचीच राहील असंही ठामपणे बजावण्यात आलं आहे. यात कोणत्याही पद्धतीचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही आणि आक्षेपार्ह घटना घडल्यास शाळेलाच जबाबदार धरलं जाईल.
काय आहे संपूर्ण प्रकरण?भोपाळमधील एका बड्या खासगी शाळेतील चिमुकल्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकलीनं जेव्हा तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती पालकांना दिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चिमुकल्या मुलीला गुड आणि बॅड टचचा फरकही कळत नाही. पण जेव्हा पालकांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी शाळेत जाऊन याबाबतची माहिती दिली. शाळेच्या व्यवस्थापनाकडून अंतर्गत चौकशी करुन आरोपी बस ड्रायव्हरला क्लीनचीट दिली होती. पालकांनी आता थेट पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे. तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं आहे.
आई-वडीलांच्या तक्रारीनंतर शाळेच्या बस ड्रायव्हरला आणि महिला मदतनीसला अटक केली आहे. ३२ वर्षीय आरोपी ड्रायव्हर दोन मुलींचा बाप आहे आणि तीनच महिन्यांपूर्वी तो शाळेच्या बसवर ड्रायव्हर म्हणून काम पाहात होता. पीडित मुलीनं एका ग्रूप फोटोच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली आहे. पोलीस सध्या याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.