कानपूर/ दिल्ली/ लखनौ : कानपूरच्या बिकरू गावात झालेल्या ८ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याचे शुक्रवारी सकाळी कानपूरजवळ पोलिसांनी एन्काऊंटर केले. मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये विकासला गुरुवारी पकडण्यात आले होते. तेथून त्याला कानपूर येथे आणले जाणार होते. परंतु कानपूरला पोहचण्याच्या आधीच घडलेल्या नाट्यमय थरारात विकास दुबे मारला गेला. विकास दुबे यांच्या चौकशीत अनेक पुरावे, धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता होती. परंतु पोलिसांच्या आजच्या कारवाईनंतर ती शक्यता पूर्णपणे मावळल्याची चर्चा सुरु आहे.कुख्यात गुन्हेगार विकास दुबे याला उज्जैनहून कानपूरला आणले जात असताना पोलिसांचे एक वाहन उलटल्यानंतर दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्याचे एन्काऊंटर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. बी. कमल यांनी पत्रकारांना सांगितले की, दुबेला हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हाच तो मृत होता. त्याच्या शरीरावर छातीवर तीन आणि हातावर एक घाव होता.वाहन उलटल्यानंतर या वाहनातील पोलीस निरीक्षक रमाकांत पचुरी आणि कॉन्स्टेबल पंकज सिंह, अनुप कुमार व प्रदीप हे जखमी झाले. याचवेळी दुबेने पचुरी यांचे पिस्तूल हिसकावले आणि पळाला. मात्र, चकमकीत जखमी झाला. पोलिसांनी सांगितले की, बिकरू येथे झालेल्या चकमकीप्रकरणी २१ जण आरोपी आहेत. यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सहा जण मारले गेले आहेत. अद्याप १२ जण वाँटेड आहेत.विरोधकांची चौकशीची मागणीउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी टष्ट्वीट केले आहे की, कार पलटली नाही, तर गुपित उघड होईल म्हणून सरकार पलटण्यापासून वाचविण्यात आले आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली चौकशी करावी, अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे.काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, दुबेला पळून जायचे असते तर त्याने उज्जैनमध्ये शरणागती पत्करलीच नसती. त्याच्याकडे अशी काय गुपिते होती? जे सत्ता-शासन यांच्यातील परस्परसंबंध उघड करणार होते?घटनाक्रमात चार पोलीसही जखमीउत्तर प्रदेश पोलीस व एसटीएफची एक टीम विकासला घेऊन शुक्रवारी सकाळी कानपूरला येत होती. कानपूरजवळ भौती येथे सकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांचे एक वाहन उलटले.यात चार पोलीस जखमी झाले, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. याचवेळी विकासने एका पोलिसाचे पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला घेरले आणि शरण येण्यास सांगितले. मात्र, तो पोलिसांवर गोळीबार करू लागला. त्यानंतर पोलिसांनी स्व-संरक्षणासाठी गोळीबार केला.यात जखमी झालेल्या विकासला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे उपचार सुरूअसताना त्याचा मृत्यू झाला. यात चार पोलीसही जखमी झाले आहेत.- प्रशांत कुमार, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था)
गँगस्टर विकास दुबेसह पुराव्यांचेही यूपी पोलिसांनी केले एन्काउंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 6:21 AM