भारतात स्लीपर सेलचे जाळे वाढवण्यासाठी पाकिस्तानचा इराणमार्गे ड्रग्स पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 04:05 PM2021-07-11T16:05:58+5:302021-07-11T16:23:32+5:30
Drugs to strengthen sleeper cells in india: 2500 कोटी रुपयांच्या हेरोइन प्रकरणात गुप्तचर संस्थांचा मोठा खुलासा
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ड्रग्स प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 2500 कोटी रुपयांची 350 किलो हिरोइन जप्त केली असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. भारतात स्लीपर सेलचे जाळे वाढवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि खलिस्तानी संघटना सोबत काम करत असल्याचा खुलासा गुप्तचर विभागाने केला आहे.
भारतातील गुप्तचर संस्थांनी सांगितल्यानुसार, हे ड्रग्स तालिबानचा ताबा असलेल्या भागातून पाकिस्तान-इराणमार्गे भारतात आणले जात आहे. या ड्रग्सला भारतातील विविध भागांमध्ये विकून मिळालेल्या पैशांचा उपयोग स्लीपर सेलला मजबुत करण्यासाठी केला जातोय. दिल्ली पोलिसंच्या स्पेशल सेलच्या सुत्रांनी सांगितल्यानुसार, ISI आणि खलिस्तान लिबरेशन फ्रंटने मध्यप्रदेशमध्ये ठाण मांडले आहे. राज्यातील ग्रामीण भागात असलेल्या छोट्या फॅक्ट्र्यांमध्ये बाहेरुन आलेल्या ड्रग्सवर प्रोसेस करुन हे ड्रग्स पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान आणि देशातील इतर राज्यात विकले जात आहे.
इराणमधून आलेली 300 किलो ड्रग्स जप्त
इराणमधून मुंबईत आलेले 300 किलो ड्रग्स डीआरआयने जप्त केले आहे. हे ड्रग्स इराणच्या जाबहार पोर्टावरुन आल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही दिल्लीत पोलिसांनी जाबहार पोर्टावरुनच आलेला 354 किलो ड्रग्सचा साठा जप्त केला होता. डीआरआयने अजूनही त्यांचे सर्च ऑपरेशन सुरू असून, संपूर्ण तपास झाल्यावर तपशीलवार माहिती सांगितली जाईल, असे सांगितले. तसेच, या ड्रग्स प्रकरणात एकाच सिंडीकेटचा हात असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.