ऑनलाइन लोकमत -
मुरथल (हरियाणा) दि. २६ - जाट आंदोलनादरम्यान मुरथल हायवेवर महिलांचे फाटलेले कपडे सापडल्याने बलात्काराची शंका व्यक्त केली जात आहे. महिलांना गाडीतून खेचून काढण्यात आलं आणि बलात्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत हरियाणाचे मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करायला सांगितला आहे. सोमवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे .
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी अशा प्रकारे बलात्कार झाल्याची तक्रार अजून कोणी केलेली नाही आहे. रविवारी रात्री ही घटना घडल्यांचं सांगण्यात येत आहे, मात्र अजूनपर्यत कोणीच साक्षीदार, तक्रारदार पुढे आलेला नाही आहे. सोबतच कोणत्याही गावक-याने अशी माहिती दिलेली नाही आहे.कोणाकडे माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पोलिसानी नागरिकांना केलं आहे. आम्ही या प्रकरणाला खुप गंभीरतेने घेत आहोत, आम्ही तपास करु आणि जर कोणी दोषी असेल तर त्याला कडक शिक्षा करु अशी माहिती हरियाणा पोलीस आयुक्त यशपाल सिंघल यांनी दिली आहे.
पोलिसांनी रस्त्यावर सापडलेल्या कपड्यांचे तुकडे गोळा केले आहेत. आणि अशा प्रकारची कोणती घटना घडली होती का याचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ३ महिला पोलिसांना नियुक्त करण्यात आलं आहे.एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ३०हून अधिक जणांच्या घोळक्याने गाड्या थांबवून १०हून अधिक महिलांना गाडीच्या बाहेर खेचून त्यांच्यावर बलात्कार केला. आणि त्यानंतर त्यांच्या गाड्यांना आग लावून देण्यात आली. यामध्ये काही साक्षीदारांनी दिलेली माहितीदेखील देण्यात आली होती. एका एनजीओने आमच्या सदस्याने पीडीतेशी बातचीत केली असून तिने बलात्कार झाल्याचं सांगितल असल्याचंही म्हणलं आहे.
पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बुधवारी हरियाणाचे मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करायला सांगितला आहे. न्यायालयाने पिडीतांना बंद लिफाफ्यात आपली तक्रार देऊ शकतात असंही न्यायालयाने सांगितल आहे, त्यांची ओळख लपवली जाईल असं आश्वासन न्यायालयाने दिलं आहे. सोमवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.