लखनऊ - उत्तर प्रदेशात पोलिसांची एक अजब कारवाई समोर आली आहे. फुलांचं नुकसान केलं म्हणून पोलिसांनी थेट गाढवांनाच अटक करुन जेलमध्ये बंद केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या या कारवाईवर जितकं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, तितकीच खिल्लीही उडवली जात आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भटक्या गाढवांवर कारागृहाबाहेरील फुलाचं नुकसान केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली पोलिसांनी गाढवांना अटक केली. इतकंच नाही तर त्यांना चार दिवस कारागृहात बंदही करण्यात आलं होतं.
याप्रकरणी उरई कारागृहाचे हेड कॉन्स्टेबल आर के मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाढवांनी कारागृहाबाहेर लावण्यात आलेल्या महागड्या फुलांचं नुकसान केलं होतं. घटनेनंतर गाढवांच्या मालकांना गाढवांना कारागृहाबाहेर फिरकू न देण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र यानंतरही गाढवांनी फुलांचं नुकसान केल्याने पोलिसांचा संताप झाला होता. गाढवांनी नष्ट केलेली फुलं फार महागडी होती. वरिष्ठ अधिका-यांनी स्वत: ती लावली होती अशी माहिती आर के मिश्रा यांनी दिली आहे.
आणखी वाचा: 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी बायकोचे ना हरकत प्रमाणपत्र !
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत गाढवांचा मुद्दा चांगलाच तापला होता. तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रायबरेलीत एका सभेदरम्यान गुजरातच्या पांढ-या गाढवांची खिल्ली उडवली होती. गुजरात पर्यटन विभागाच्या एका जाहिरातीची खिल्ली उडवताना अखिलेश यादव बोलले होते की, 'एका गाढवाची जाहिरात येते. मी बॉलिवूडच्या महानायकाला गुजरातच्या गाढवांचा प्रचार न करण्याची विनंती करतो'.
अखिलेस यादव यांच्या वक्तव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देताना म्हटलं होतं की, 'मन स्वच्छ असेल तर कोणाकडूनही प्रेरणा घेतली जाऊ शकते. गाढव आपल्या मालकाशी एकनिष्ठ असतो. ते कमी खर्चात काम पुर्ण करतो'.