कोची : अय्यप्पा मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी केरळमध्ये गुरुवारी (3 जानेवारी) बंद पाळला. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. हिंसाचारात एक ठार तसेच 38 पोलिसांसह 100 हून अधिक लोक जखमी झाले. हिंसाचाराप्रकरणी 745 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय जबरदस्तीने दुकाने बंद करू पाहणाऱ्या भाजपाच्या 4 कार्यकर्त्यांना अज्ञात इसमांनी भोसकले. बंददरम्यान वाहनांची आणि दुकानांची मोडतोड करण्यात आली असून काही ठिकाणी माकपच्या कार्यालयांवर आणि पोलीस ठाण्यांवर हल्ले करण्यात आले.
हिंदू संघटनांच्या शिखर संस्थेने बंदची हाक दिली होती. या बंदला भाजपने पाठिंबा दिला होता. काँग्रेसनेही काळा दिन पाळला. पंडालम, कोळीकोड, कासारगोडे, ओट्टपलम येथे निदर्शकांनी काही पक्षांच्या कार्यालयावर हल्ले चढविले. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. कोळीकोड येथे अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. पल्लकडमध्ये संघ, भाजपाच्या मोर्चात पत्रकारांना मारहाण करण्यात आली.
महिला भक्त दर्शन घेऊन निघून जाताच मुख्य पुजाऱ्याने मंदिर शुद्धीकरणासाठी एक तास बंद ठेवले. त्याने न्यायालयाचा अवमान केल्याने अॅड. दिनेश यांनी आपल्या याचिकेची लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयास केली. पण त्यास न्यायालयाने नकार दिला. मूळ निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी 49 याचिका न्यायालयात आल्या असून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर 22 जानेवारी रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.