ऑनलाइन लोकमत
रामपूर, दि. 22 - बलात्काराचा आघात सहन करुन तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या महिलेकडे पोलीस अधिका-यानेच शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरप्रदेशच्या रामपूर गंज पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला. मोकाट फिरणा-या बलात्का-यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी 37 वर्षीय पीडित महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. काही महिन्यांपूर्वी पीडित महिलेवर दोघा आरोपींनी बलात्कार केला होता. आरोपी गावात मोकाट फिरत असल्याने आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तुम्ही आरोपींना तात्काळ अटक करा असे या महिलेने पोलीस अधिका-याला सांगितले. पण पोलीस अधिका-याने तक्रार नोंदवून घेण्याऐवजी उलट महिलेकडेच शरीरसुखाची मागणी केली.
जेव्हा या महिलेने पोलीस अधिका-याची मागणी धुडकावून लावली. तेव्हा तिला आणखी एक धक्का बसला. पोलीस उपनिरीक्षकाने तिच्यावरील बलात्कार प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. काय करावे ते या महिलेला समजत नव्हते. कोण आपल्याला मदत करेल या विवंचनेत ती होती. त्यानंतर तिने पुन्हा पोलीस अधिका-यांशी संपर्क साधला. त्यावेळी तिने अधिका-याबरोबर झालेल्या सर्व संवादाचे रेकॉर्डींग केले. पुरावा हाती आल्यानंतर बुधवारी तिने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. एसपींनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 फेब्रुवारीच्या रात्री पीडित महिलेवर दोघा आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता. यातील एक आरोपी महिलेच्या परिचयाचा होता. महिला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी गेली होती. तिथून ती रामपूरला परतत असताना ही घटना घडली. दोघा आरोपींनी तिला घरापर्यंत लिफ्ट दिली. जेव्हा महिला घरात एकटी असल्याचे समजले तेव्हा त्यांनी बंदुकीच्या धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळीही पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिला होता. जेव्हा महिला स्थानिक कोर्टात गेली तेव्हा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.
जय प्रकाश सिंह या पोलीस अधिका-याची भेट घेऊन मी त्याच्याकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पण त्याने माझ्याकडेच शरीरसुखाची मागणी केली. त्याने माझ्या मोबाईलवर फोन केला व घरी मला एकटीला बोलावले. जेव्हा मी त्याची मागणी धुडकावून लावली तेव्हा प्रकरण बंद करण्यासाठी त्याने क्लोजर रिपोर्ट दाखल केला असे पीडित महिलेने सांगितले.