नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्मघाती बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारे पत्र लिहिणाऱ्या आरोपीला केरळ पोलिसांनी शनिवारी अटक केली. पंतप्रधान मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर रवाना होणार आहेत. कोची शहराचे पोलिस आयुक्त के. सेतु रामन म्हणाले की, पंतप्रधानांविरोधात धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी झेवियरला काल अटक करण्यात आली. वैयक्तिक वैमनस्यातून आरोपीने शेजाऱ्याला गुन्ह्यात गोवण्यासाठी पत्र लिहिले होते. फॉरेन्सिकच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला.
आता पाण्यावर धावणार मेट्रो; 25 एप्रिल रोजी PM मोदी करणार या महत्वकांशी प्रकल्पाचे उद्घाटन
कोची येथील एका व्यक्तीने मल्याळम भाषेत लिहिलेले हे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष के.के. सुरेंद्रन यांच्या कार्यालयात पाठवले होते. त्यांनी गेल्या आठवड्यात पोलिसांकडे हे पत्र सोपवले होते. सुरुवातीला पोलिसांनी एनके जॉनी नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला, ज्याचा पत्ता पत्रात देण्यात आला होता. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान मोदींनाही फटका सहन करावा लागेल, असे त्या पत्रात म्हटले होते. कोची येथील रहिवासी असलेल्या जॉनीने पत्र लिहिले नसल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी जॉनीच्या नावाने पत्र लिहिणाऱ्याला अटक केले.
पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूकपरराष्ट्र राज्यमंत्री आणि भाजप नेते व्ही. मुरलीधरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आत्मघातकी हल्ल्याच्या धमकीशी संबंधित प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेची माहिती मीडिया आणि व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये लीक झाली. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे केरळ सरकारने यावर मौन बाळगले. 24 तासांच्या आत जबाबदार व्यक्तीची ओळख पटवायला हवी होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही, असे त्यांनी म्हटले.