ऑनलाइन लोकमत
दादरी (उत्तर प्रदेश), दि. ७ - विश्व हिंदू परीषदेच्या कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या साध्वी प्राचींना पोलीसांनी दादरीमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला असून त्यांना तात्पुरते ताब्यात घेतले आहे.
मोहम्मद अखलाख या मुस्लीमाची बीफ बाळगल्याच्या संशयावरून हत्या झाली होती. या घटनेनंतर दादरीमधल्या बिसखेडा गावातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले असून त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दादरीमधल्या या दुर्दैवी कुटुंबाला भेट दिली असून आधीच गावात धार्मिक दुही निर्माण होत आहे. त्यात भर म्हणून साध्वी प्राचींनी आपण दादरीला भेट देणार असल्याचे जाहीर केले आणि पोलीस व प्रशासनाची डोकेदुखी वाढली. धार्मिक तेढ होऊ नये म्हणून कुणाचीही गय करू नका असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत.
जर अकबरुद्दिन ओवेसीना तिथं जाऊ दिलं जातं तर मला का नाही असा प्रश्न विचारत आपण दादरीला जाणार असं त्यांनी जाहीर केलं आहे. याआधी संगीस सोम यांनी दादरीमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर प्राचींना दादरीत प्रवेश करण्यास पोलीसांनी मनाई केली आहे. त्यांना काही वेळ पोलीसांनी ताब्यात घेतले, दादरीबाहेरच थांबवले आणि परत दादरीमध्ये येऊ नका असे सांगत त्यांची बोळवण केली.