- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारच्या बनारपूर (जि. बक्सर) गावाजवळ औष्णिक वीज प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकरी ८५ दिवसांपासून करत असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. मंगळवारी रात्री बक्सर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या घरांवर लाठीहल्ला केला. त्यामुळे अनेक ग्रामस्थ जखमी झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला.
ग्रामस्थांनी वीज केंद्रावर लाठ्या-रॉडने हल्ला केला. पोलिसांच्या १३ वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली. यामध्ये चार पोलिस जखमी झाले आहेत.ग्रामस्थांनी लाठ्या-काठ्या घेऊन प्रकल्पावर हल्ला केला. जमावाने पोलिसांची दोन वज्र वाहने, तीन बाईक, तीन कंपनीच्या बस, तीन फायर इंजिन, एक रुग्णवाहिका आणि एक क्रेन जाळली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
८५ दिवसांपासून आंदोलन
गेल्या ८५ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मंगळवारी शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या मुख्य द्वाराला कुलूप लावून धरणे धरले. त्यावेळी पोलिसांनी काहीही केले नाही, मात्र रात्री पोलिसांनी बनारपूर गावात घुसून बेदम मारहाण केली. चारजणांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी लोकांचा रोष उसळला.
पोलिसांचा अमानवी चेहरा समोर
बनारपूर गावाजवळ औष्णिक वीज प्रकल्प उभारला जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर बनारपूरमध्ये पोलिसांचा अमानवी चेहरा समोर आला. येथील घरात घुसून रात्री १२ वाजता झोपलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आलेल्या महिला आणि लहान मुलांनाही पोलिसांकडून मारण्यात करण्यात आली. शेतकऱ्यांवर पोलिसांच्या अत्याचाराचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये पोलिस बेदम मारहाण करताना दिसतात. शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
नितीश सरकार ‘गुंडाराज’
बक्सर येथील घटनेनंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या मारहाणीनंतर नितीश सरकारला ‘गुंडाराज’ म्हटले आहे.