- बलवंत तक्षक चंदीगढ : हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा मतदारसंघ कर्नालमध्ये बसताडा टोलनाक्यावर जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. यात भाजपच्या नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटली आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी ठिय्या मांडून रस्ते रोखून धरले तर विरोधी पक्षांची सरकारवर जोरदार टीका केली आहे.
या कारवाईच्या निषेधार्थ भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले. नंतर शेतकऱ्यांनी तत्काळ हिसार-दिल्ली मार्गावरील टोलनाक्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यासोबत जिंद चौक, बसताडा टोलनाका, रोहतक येथील मकडौली टोलनाका, नरवानामधील बद्दोवाल टोलनाका, कैथलमधील तितरम चौक, पटियाला मार्गावर ठिकाणी शेतकऱ्यांनी ठाण मांडले. अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यांच्या मघोमध बसले. अनेक ठिकाणी वाहतूक इतर मार्गाने वळवावी लागली.
करनालचे उपजिल्हाधिकारी निशांत यादव म्हणाले की, सुरुवातील शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऐकण्यास नकार दिल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीमार केला. यात काही शेतकरी तसेच पोलिसांनाही इजा झाली आहे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करनालमध्ये होणार असलेल्या भाजपच्या बैठकीला विरोध करण्याचा इशारा आधीच दिला होता. हे लक्षात घेता करनालमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. कारवाईच्या निषेधार्थ भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले.
चौकशीची मागणी
काँग्रेस नेते राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी तसेच राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवावला यांनीहा या लाठीचार्जबाबत सरकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनीही लाठीमारीचा निंदा केली आहे. ते म्हणाले की, सरकार लाठ्या व बंदुकीच्या सहाय्याने नाही तर परस्पर सहमतीने चालवले पाहिजे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड़ म्हणाले की, पोलिसांनी कोणत्या परिस्थितील लाठीचार्ज केला याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे.