Haryana CM Manohar Lal Khattar on Nuh Violence : हरयाणातील नूह जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराने आतापर्यंत ६ जणांचा जीव घेतला. कित्येक वाहने जाळली गेली, शेकडो दुकानांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून या हिंसाचाराच्या आगीत अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने देखील या हिंसाचारावर तातडीने सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. अशातच हरयाणाचेमुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे एक विधान चर्चेत आहे. पोलीस सर्वांना संरक्षण देऊ शकत नाहीत, असे खट्टर यांनी म्हटले आहे. बुधवारी चंदीगडमध्ये हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, राज्याची लोकसंख्या २.७ कोटी आहे. आमच्याकडे ६० हजार जवान आहेत. अशा परिस्थितीत पोलीस प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करू शकत नाहीत. एखाद्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीकडून हिंसाचाराच्या स्थितीत असे बोलणे अत्यंत वादग्रस्त असल्याची टीका विरोधक करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे हिंसाचारात बळी पडलेल्यांचे मनोबल खचले आहे, अशा तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दोषींना सोडणार नाही - मुख्यमंत्री मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात कोणतीही बेकायदेशीर कामे होऊ नयेत यासाठी २० निमलष्करी दल तैनात करण्यात आली आहेत. ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ पोलीस कर्मचारी आणि ४ नागरिकांचा समावेश आहे. तर, ११६ जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य ९० जणांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशीनंतर कारवाई केली जाईल. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. भारतीय राखीव बटालियनही नूहमध्ये तैनात करण्यात येणार असल्याचे खट्टर यांनी सांगितले.