ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 23 - दवाखान्यात उपचार घेऊन चुलतीसोबत गावाकडे परतत असलेल्या एका युवतीस युवकाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, चुलतीने आरडाओरड केल्याने आणि शुक्रवारचा आठवडी बाजार असल्याने युवकास पकडण्यात आले. त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले असता हे ‘सैराट’ जोडपे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा जबाब घेऊन सोडून दिले. ही घटना शुक्रवारी दुपारी चाकुरात घडली.
चाकूर तालुक्यातील भाटसांगवी येथील एक कुटुंबिय व्यवसायानिमित्त २० वर्षांपूर्वी हैदराबाद येथे स्थायिक झाले. या कुटुंबातील २२ वर्षीय मुलीचे तिथेच एका ज्वेलर्समध्ये काम करणा-या २४ वर्षीय युवकावर प्रेम जडले. सदर, युवक हा केसरजवळगा (ता. भालकी) येथील रहिवासी आहे. दोन- तीन वर्षांपासून या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते.
दरम्यान, रविवारी सदरील युवती ही भाटसांगवी येथे राहणा-या चुलत्याकडे आली होती. शुक्रवारी युवती व तिची चुलती या दोघी चाकुरात दवाखान्यासाठी आल्या होत्या. दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर त्या पुन्हा गावाकडे परतण्यासाठी जून्या बसस्थानकाजवळ आल्या होत्या. तेव्हा तिचा प्रियकर आला आणि त्याने काही समजण्याच्या अगोदर युवतीच्या हातास धरुन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चुलतीने आरडाओरड केल्याने एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांनी त्या युवकास पकडले.
दरम्यान, ही माहिती ठाण्यास देण्यात आल्याने पोलीस दाखल झाले. पोलिसांनी या दोघांनाही ठाण्यात नेले. तिथे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी चौकशी केली, असता दोघेही सज्ञान असून त्यांनी भालकी येथे विवाह नोंदणीसाठी अर्ज केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी दोघांचा जबाब घेऊन सोडून दिले.