हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये श्रीमती डी धना लक्ष्मी या ट्रॅफिक पोलीस पाहायला मिळत आहेत. समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. व्हिडिओमध्ये त्या हैदराबादच्या टॉलीचौकी उड्डाणपुलाजवळील नाला हाताने साफ करत असलेलं दिसत आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे, ज्याचा वाहतुकीला फटका बसला आहे. आणखी एक व्यक्ती रस्त्यावरील अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. थोड्याच वेळात, लक्ष्मी साफसफाईची प्रक्रिया वेगात करण्याच्या प्रयत्नात त्या व्यक्तीला मदत करतात. दोघांच्या प्रयत्नांमुळे पाण्याचा वेग कमी झाला आणि वाहतूक पूर्ववत झाली. हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी लक्ष्मीच्या प्रशंसनीय कार्याचे कौतुक करत हा व्हि़डीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोशल मीडियावर शेअर केल्यापासून हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे आणि 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या लोकांकडून 3 हजारांहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्सही आल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, "खरोखर उत्तम सेवा. नागरिकांना सर्वत्र कचरा टाकताना लाज वाटली पाहिजे."
दुसर्या युजरने म्हटलं की, "खूप छान पण तुम्ही GHMC ला हे काम करायला भाग पाडलेत. खेदाची गोष्ट म्हणजे मदत करण्यासाठी कोणीही थांबलं नाही." ही घटना लक्ष्मी सारख्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांच्या समर्पण आणि वचनबद्धतेची साक्ष देते. जे आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन लोकांची सुरक्षेला महत्त्व देतात. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.