Mamata Banerjee Kolkata Doctor Case : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना एक मोठा खुलासा केला. कोलकातामधील आरजी कर रुग्णालयात डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. पोलीस आयुक्त ममता बॅनर्जींकडे राजीनामा देण्यासाठी गेले होते. पण, ममता बॅनर्जींनी त्यांना थांबवले. याबद्दलच ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले.
"काही लोकांना बंगालमध्ये हिंसा भडकवायचीय"
ममता बॅनर्जींनी मंत्रालयात बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "दुर्गा पूजेदरम्यान आपल्या सगळ्यांना सतर्क राहावे लागेल. धर्म ही व्यक्तिगत गोष्ट आहे, पण उत्सव सगळ्यांचा आहे. दुर्गा पूजा आपला सगळ्यात मोठा सण आहे आणि बंगालला बदनाम करण्याचा कट पूर्ण होता कामा नये. काही वृत्तवाहिन्या टीआरपीसाठी लोकांना भडकावत आहेत. काही लोकांना बंगालमध्ये हिंसा भडकवायची आहे."
ममता बॅनर्जी म्हणाल्या, पोलीस आयुक्तांना मी थांबवले
आरजी कर रुग्णालयातील प्रकरणानंतर पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मागच्या आठवड्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त स्वतः माझ्याकडे आले होते. त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. पण, दुर्गा पूजेचा सण जवळ आला आहे. कुणाला तरी कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती असायला हवे. त्यामुळे मी त्यांना राजीनामा देण्यापासून थांबवले."
यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी कधीही मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांना पैसे देण्याची ऑफर दिली नाही. माझ्या बदनामीशिवाय यात दुसरे काहीही नाही."
कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांना विरोधकांनी घेरले आहे. तृणमूल काँग्रेसमधील काही नेत्यांनीही यावरून ममता बॅनर्जींना घरचा आहेर दिला आहे.