नवी दिल्ली : दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अलीकडच्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीच्या आप सरकारने अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. यामधील 'मुख्यमंत्री महिला सन्मान योजना' आणि 'संजीवनी योजना' याबाबत बदरपूर येथील एका महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.
या महिलेने अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर 'मुख्यमंत्री महिला सन्मान योजना' आणि 'संजीवनी योजना' संदर्भात फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. महिलेने ही योजना बनावट असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी दक्षिण दिल्लीतील भाजप खासदार रामवीर सिंह बिधुरी यांनी अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भाजप खासदार रामवीर सिंह बिधुरी यांनी सांगितले की, योजनांच्या नोंदणीबाबत अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. केजरीवाल हे केवळ 'मुख्यमंत्री महिला सन्मान योजना' आणि 'संजीवनी योजना' घेऊन जनतेची फसवणूक करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या दोन्ही योजना जनतेची फसवणूक करण्याच्या सुनियोजित कटाचा भाग म्हणून करण्यात आल्या आहेत, असा आरोप रामवीर सिंह बिधुरी यांनी केला.
रामवीर सिंह बिधुरी म्हणाले की, या योजना दिल्ली सरकारने अधिसूचित केल्या नाहीत. त्यामुळे घोषणेच्या वेळी मुख्यमंत्री अतिशी उपस्थित होत्या. मात्र अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. मंत्रिमंडळाने महिलांना देण्यात येणारी रक्कम 1,000 रुपये मंजूर केली. मात्र, याचा प्रचार 2,100 रुपयांची योजना म्हणून केला. तसेच संजीवनी योजनेचीही घोषणा केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली.
पुढे रामवीर सिंह बिधुरी म्हणाले, एवढेच नाही तर या योजनांसाठी बनावट नोंदणी केली जात आहे. बनावट कार्ड दिले जात आहेत. नोंदणी किंवा कार्डचा कोणताही कायदेशीर अर्थ नाही. निष्पाप जनतेची फसवणूक करण्यासाठीच हे करण्यात आले आहे. या दोन्ही योजना बनावट असल्याची माहिती खुद्द दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी जनतेला दिली आहे.
काही महिलांनी बदरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीदोन्ही योजना बनावट असल्यामुळेच आता काही महिलांनी बदरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे रामवीर सिंह बिधुरी यांनी सांगितले. तसेच, दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेली सार्वजनिक माहिती, बनावट कार्ड आणि केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांचा सहभाग पूर्णपणे सिद्ध झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, असेही रामवीर सिंह बिधुरी यांनी म्हटले आहे.