उत्तर प्रदेशातील बांदा येथे एक पोलीस कर्मचारी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर तेराव्याच्या विधीसाठी घरी गेला होता. पण त्याच दरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बांदा येथे तैनात असलेल्या कॉन्स्टेबलच्या मृत्यूने संपूर्ण पोलीस विभागाला मोठा धक्का बसला आहे.
कॉन्स्टेबल रविशंकर पुखरायां हे डेप्युटी एसपी कार्यालयात तैनात होते, गेल्या 4 दिवसांपासून ते त्यांच्या वडिलांच्या तेराव्या विधीत सहभागी होण्यासाठी घरी पोहोचले होते. त्याचवेळी त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल यांना लिव्हर संबंधित आजार होता, या घटनेनंतर पोलीस-प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांचं सांत्वन केलं असून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हेड कॉन्स्टेबल रविशंकर पुखरायां हे कानपूरचे रहिवासी होते आणि गेल्या अनेक वर्षांपासून बांदा जिल्ह्यात तैनात होते. नुकतंच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं, त्यानंतर ते तेराव्यासाठी त्यांच्या घरी गेले होते, तेथे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. कानपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. त्यांना दोन मुलं आहेत.