लखनौ - उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात पोलिसांनी रस्ते अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या 2 अल्पवयीन मुलांना पोलीस वाहनातून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमींना मदत करण्यास नकार देणा-या या तीन पोलीस कर्मचा-यांचं निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, वेळीच मदत न मिळाल्यानं या दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये नेलं जात असताना वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 100 या हेल्पलाईन क्रमांकावर ड्युटीवर असलेल्या तीन पोलिसांनी रक्तानं गाडी खराब होईल, असे सांगत जखमींना मदत नाकारल्याची कथित माहिती समोर आली आहे.
सहारनपूरचे एसपी प्रबल प्रतास सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (18 जानेवारी) रात्री अर्पित खुराना (1वय 7 वर्ष) आणि त्याचा मित्र सनी (वय 17 वर्ष) बाईकवरुन घराकडे परतत असताना बेरी बाग परिसरात मंगलनगर चौकात नियंत्रण सुटल्यानं त्यांची बाईक एका खांबाला जाऊन आदळली आणि जवळील एका नाल्यात पडली. यावेळी घटनास्थळावरील लोकांना या दोघांना मदत करत नाल्याबाहेर काढले. मात्र या घटनेत दोघंही गंभीर जखमी झाले होते. यावेळी नागरिकांनी 100 क्रमांकावर संपर्क साधत मदत मागितली, त्यावेळी पोलिसांकडून धक्कादायक असेच उत्तर मिळाले.
गाडी खराब होईल असं सांगत पोलीस कर्मचा-यांनी जखमी मुलांना आपल्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर नागरिकांनी टेम्पोच्या मदतीनं जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एसपी प्रबल सिंह यांनी कठोर कारवाई करत 100 क्रमांकावर सेवेसाठी तैनात असणा-या तिन्ही पोलीस कर्मचारी हेड कॉन्स्टेबल इंद्रपाल सिंह, कॉन्स्टेबल पंकज कुमार आणि चालक मनोज कुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.