रेवाडी : हरियाणाच्या रेवाडी शहरातील एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही तिच्या परिचयाचे आहेत. ती क्लासला निघाली असता, कारने आलेल्या तिघांनी तिला आपण क्लासमध्ये सोडतो, असे सांगून तिचे अपहरण केले होते.पोलिसांनी सांगितले की, या धक्कादायक घटनेतील मुख्य आरोपी नीशूला अटक करण्यात आम्हाला यश आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने ३0 तासांतच मुख्य आरोपीला अटक केली. त्यामध्ये डॉ. संजीव कुमार व दीनदयाळ यांचा समावेश आहे. नीशू, संजीव व मीरसिंह दीनदयाळ या तिघांना पाच दिवस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकारात लष्करातील पंकज नावाचा जवानही सहभागी होता; पण तो आणि मनीष हे प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी झालेले दोघे जण अद्याप फरार असून, त्यांचा शोध आम्ही घेत आहोत. दीनदयाल जिथे राहत असे, तिथेच त्या तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. डॉ. संजीव याने तिन्ही आरोपींना मदत केली. या घटनेत तो सहभागी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. मुख्य आरोपी नीशूने हा संपूर्ण कट रचला होता. रेवाडी (हरियाणा) येथे गेल्या आठवड्यात १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ दिल्लीतील हरियाणा भवनबाहेर सोमवारी निदर्शने करण्यात आली.
रेवाडी बलात्कार प्रकरणात तिघांना पोलीस कोठडी; दोघांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 11:19 PM