नवी दिल्ली- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबरोबरच हमीभाव, कर्जमाफी यांसारख्या विविध मागण्यांसाठी शेतक-यांचा मोठा ताफा आज दिल्लीत धडकला. शेतक-यांच्या या मोर्च्यादरम्यान आंदोलन आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. तसेच शेतक-यांनीही पोलिसांवर दगडफेक केली आहे, त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.पोलिसांनी आक्रमकपणे कारवाई करत शेतक-यांच्या मोर्चावर पाण्याचा फवारा मारला. पोलिसांच्या आक्रमक कारवाईत अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. त्यातच पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवाईचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी समर्थन केलं आहे. पोलिसांनी आक्रमक कारवाई केलेली नाही. पोलिसांनी आपल्या बचावासाठी कारवाई केली आहे. शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत. पोलिसांनी एकंदरित शेतक-यांवर केलेल्या कारवाईचं केंद्रीय गृहमंत्र्यांनी समर्थन केलं आहे. त्यामुळे सरकारवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे.शेतक-यांनी 23 सप्टेंबरपासून हरिद्वारमधून पदयात्रेला सुरुवात केली होती. त्यानंतर शेतकरी उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत सोमवारी 1 ऑक्टोबर रोजी झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतक-यांनी मोर्चा दिल्लीकडे वळवला. भारतीय किसान युनियनने ‘किसान क्रांती यात्रा’ या मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात 50 हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील राजघाट येथे या यात्रेचा समारोप होण्याची शक्यता आहे.
Kisan Kranti Padyatra: पोलिसांनी केलेल्या कारवाईचं राजनाथ सिंहांकडून समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 1:39 PM